
मुंबई JPN NEWS - वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि सबवे प्रकल्पाचे काम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. प्रकल्पस्थळी पाहणी करून त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि उर्वरित कामांना वेग देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बाजूला १८ पैकी १७ पाइल कॅप, १७ पिअर आणि १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. जिजामाता नगरच्या बाजूला पायलिंगसह १७ पैकी १७ पाइल कॅप, पिअर आणि पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे.
१८ पैकी १७ गर्डर स्पॅन तयार -
प्रकल्पातील पोर्टल बीम आणि गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू आहे. १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एका गर्डर स्पॅनचे काम प्रगतिपथावर आहे.
पोर्टल बीम आणि गर्डर स्पॅन उभारणीच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत १४ पैकी १३ पोर्टल बीम आणि १८ पैकी ९ गर्डर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. तर डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम १८ पैकी ७ स्पॅनमध्ये पूर्ण झाले असून, आणखी दोन स्पॅनचे काँक्रिटीकरण सुरू आहे.
प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा -
या उड्डाणपुलामुळे वरळी परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना वरळी नाका अर्थात आचार्य अत्रे चौकातून वळसा घालावा लागतो. प्रस्तावित उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
या पुलामुळे ई. मोझेस मार्गावरून थेट अॅनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे (कोस्टल रोड) जाण्यासाठी अधिक सोयीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येणार आहे.
यामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याबरोबरच प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी झाल्याने इंधनाचीही बचत होण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवण्याचे निर्देश -
प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामाचा वेग वाढवावा, तसेच वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून योग्य वाहतूक आराखडा तयार करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
पाहणीवेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment