Mumbai BEST बसच्या धडकेत कोंबड्या उतरवणाऱ्या कामगाराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2026

Mumbai BEST बसच्या धडकेत कोंबड्या उतरवणाऱ्या कामगाराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


मुंबई JPN NEWS - मजास डेपो परिसरातील पीएमजी कॉलनी येथे BEST बस आणि कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोशी संबंधित अपघातात ५३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. फरीद अहमद शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी MIDC पोलिसांनी BEST बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मजास डेपो येथून अंधेरीच्या दिशेने जाणारी BEST बस (क्रमांक MH-01-EM-2361, मार्ग क्रमांक ४४१/३१) पीएमजी कॉलनी परिसरातून जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो (क्रमांक MH-02-FL-9533) उभा होता. टेम्पोमधून कोंबड्या उतरवण्याचे काम फरीद अहमद शेख करत होते.

बसचालकाच्या जबाबानुसार, टेम्पोच्या मागील बाजूचा दरवाजा उघडण्यात आला असता तो बसच्या मागील डाव्या कोपऱ्याला धडकला आणि परत येऊन कोंबड्या उतरवणाऱ्या शेख यांना लागला. त्यामुळे ते खाली पडून जखमी झाले. त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर बसचालकाला प्रवाशांकडून घटनेची माहिती मिळाल्यावर त्याने बस थांबवली. त्यानंतर चालकाने पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. MIDC पोलिसांनी घटनास्थळी येऊन बस आणि टेम्पो पोलीस ठाण्यात नेले. मृत्यूची माहिती पोलिसांकडून नंतर मिळाल्याने हा अपघात उशिराने कळवण्यात आल्याचे BEST च्या सुधारित अहवालात नमूद आहे.

या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी FIR क्रमांक ११८७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ आणि १२५(ब), तसेच मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त बस मजास डेपोमध्ये ठेवण्यात आली असून, आरटीओ तपासणीसह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS