Mumbai - BEST कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा दिवाळी बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला बँक खात्यात जमा होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2026

Mumbai - BEST कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा दिवाळी बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला बँक खात्यात जमा होणार


मुंबई JPN NEWS -  बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी आज कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनुदानात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत ही रक्कम जमा केली जाणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी सर्व कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. या मागणीवर बेस्ट समितीच्या बैठकीतही चर्चा झाली होती. दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतल्यानंतर बेस्ट भवनात कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला होता. त्यांच्या या घोषणेमुळे बेस्ट बोनसवरून राजकीय श्रेयवादाची चर्चा सुरू झाली होती.

या पार्श्वभूमीवर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांसाठी अधिकृत सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बेस्ट उपक्रमातील एकूण २२ हजार ६५४ सेवकवर्गांना प्रत्येकी ३३ हजार रुपये देण्यात येणार असून, यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वासराव यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांची वाढ झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता ३ नोव्हेंबर रोजी अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

ही बातमीही वाचा 

BEST बोनसवरून राजकीय श्रेयवाद; प्रसाद लाड यांच्या घोषणेनंतर समिती अध्यक्षांची पत्रकार परिषद
https://www.jpnnews.in/2026/10/Political-Credit-Row-Over-BEST-Diwali-Bonus.html


No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS