Mumbai अनधिकृत जाहिरातींविरोधात महापालिकेची धडक मोहीम; ५२ हजारांहून अधिक बॅनर हटवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2026

Mumbai अनधिकृत जाहिरातींविरोधात महापालिकेची धडक मोहीम; ५२ हजारांहून अधिक बॅनर हटवले


मुंबई JPN NEWS - शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स आणि जाहिरात फलकांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. १ जानेवारी ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तब्बल ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. तर, ८ ते १६ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३ हजार ५३७ अनधिकृत जाहिरात साहित्य जप्त करण्यात आले.

अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांविरोधातही महापालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अनुज्ञापन विभागाच्या तक्रारींनंतर चार प्रकरणांत पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले असून, अन्य ३३३ प्रकरणांत पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांना लेखी तक्रार अर्ज पाठवण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी १७ ऑक्टोबर रोजी वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ही मोहीम वर्षभर, म्हणजेच ३६५ दिवस सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अनधिकृत जाहिरात फलक तातडीने हटवण्यावर भर देण्यात येणार आहे.

महापौर रितू तावडे यांनी घोषित केलेल्या ‘शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस’ या मोहिमेत महापालिकेच्या अनुज्ञापन, परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांसह संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आयुक्तांनी सांगितले. मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्यही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिकृत जाहिरात फलकांची ओळख सहज पटावी, यासाठी भविष्यात त्यांच्यावर क्यूआर (QR) कोड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, विनापरवाना जाहिरात फलक छापणाऱ्या मुद्रकांवर आणि जाहिरात एजन्सींवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम, १९९५’ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिराती लावणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS