
मुंबई JPN NEWS - मुंबईकरांना पदपथांवरून सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत आतापर्यंत २६ प्रशासकीय विभागांमधील ३९९ पदपथांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत २ हजार ८०३ अतिक्रमणे आणि फेरीवाले हटवण्यात आले असून, सुमारे ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांजवळील पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पदपथांवर दुकाने, स्टॉल्स किंवा साहित्य ठेवून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला.
दुचाकी पार्किंग आणि अनधिकृत रॅम्पवरही कारवाई -
१७ ऑक्टोबर रोजी वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पदपथ कायमस्वरूपी मोकळे ठेवण्याचे निर्देश दिले. पदपथांवरील अनधिकृत दुचाकी पार्किंग रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधावा, तसेच योग्य ठिकाणी नियोजनबद्ध वाहनतळ आणि स्वतंत्र पार्किंग-बे विकसित करावेत, असे त्यांनी सांगितले.
काही गृहनिर्माण संस्थांनी पदपथांमध्ये बदल करून वाहनांसाठी अनधिकृत रॅम्प तयार केले आहेत. अशा प्रकरणांची तपासणी करून संबंधितांना नोटिसा बजावाव्यात आणि नियमानुसार कारवाई करून पदपथांची मूळ रचना पूर्ववत करावी, असे निर्देशही देण्यात आले.
अतिक्रमण हटवल्यानंतर पदपथांची दुरुस्ती -
अतिक्रमणे हटवल्यानंतर पदपथांची तातडीने दुरुस्ती, स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. अधिकृत दुकाने व स्टॉल्सचे स्थलांतर करताना त्यांच्या मूळ क्षेत्रफळाची आणि परवानग्यांची पडताळणी करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांसह वाहनांची खरेदी-विक्री करण्यासाठी सार्वजनिक जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ तात्पुरती कारवाई न करता पदपथ पादचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित आणि मोकळे राहतील, याची दक्षता घेण्यावर महापालिकेने भर दिला आहे.


No comments:
Post a Comment