
मुंबई JPN NEWS - गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ₹१ लाख ३० हजारांची लाच स्वीकारताना बोरीवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई ५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.
ACBने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ६५ वर्षीय तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे (वय ३१) यांनी तक्रारदाराकडे ₹१ लाख ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी मुंबई ACBकडे याबाबत लेखी तक्रार केली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी ACBच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ₹१ लाख ५० हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ₹१ लाख ३० हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य करण्यात आल्याचे ACBने सांगितले.
त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी ACBने सापळा रचला. या कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पराडे यांना तक्रारदाराकडून ₹१ लाख ३० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांना सायंकाळी ५.४२ वाजता बोरीवली पोलीस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ACBने दिली.
कारवाईदरम्यान आरोपी पोलीस अधिकाऱ्याची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू असल्याचे ACBने सांगितले.
या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास मुंबई ACBकडून सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त प्रवीण नावडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली, पोलीस निरीक्षक विठ्ठल पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे. नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०६४ तसेच मुंबई ACBचा WhatsApp क्रमांक ८८२८२४१०६४ उपलब्ध करून देण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment