Mumbai वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ संकल्पना दृष्टिपथात - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2026

Mumbai वेगवान पायाभूत सुविधा निर्मितीमुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ संकल्पना दृष्टिपथात - मुख्यमंत्री


मुंबई JPN NEWS - मुंबई महानगर क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे महानगराच्या एका भागातून दुसऱ्या भागात कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम संपर्कव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, किनारी रस्ता आणि भूमिगत बोगद्यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. या पायाभूत सुविधा विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे आणि वाहतूक कोंडी कमी करणे हेच पायाभूत सुविधा विकासाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (२२ ऑक्टोबर) वर्षा शासकीय निवासस्थानातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विविध मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही केवळ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नसून देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन आहे. त्यामुळे शहराचा विकास करताना आजच्या गरजांसोबतच पुढील २५ ते ५० वर्षांचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवले जात आहे. काँक्रीटचे रस्ते, कोस्टल रोड, उड्डाणपूल आणि बोगदे हे स्वतंत्र प्रकल्प नसून एका व्यापक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. या सर्व प्रकल्पांच्या एकत्रित विकासामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होतील आणि मुंबईच्या विविध भागांमधील प्रवास अधिक वेगवान होईल.

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले पायाभूत सुविधा प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तेशी तडजोड न करता पूर्ण करावेत. प्रकल्पांमधील अडथळे दूर करून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

विद्याविहारमधील प्रवास ३० मिनिटांवरून १० मिनिटांवर - 
विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातील पूर्व-पश्चिम प्रवासासाठी यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. नव्या पुलामुळे हा प्रवास अंदाजे १० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.

या पुलाची एकूण लांबी सुमारे ६०० मीटर असून रुंदी १५.५० ते १७.५० मीटर आहे. विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडणारा हा पूल स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

शीवचा ११२ वर्षे जुना पूल नव्या स्वरूपात - 
शीव रेल्वे स्थानकाजवळील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल असुरक्षित झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सुमारे चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.

नव्या रेल्वे पुलाची लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. पुलामध्ये ४९६ टन वजनाचे दोन सेमी-थ्रू स्टील गर्डर वापरण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, धारावी आणि वांद्रे परिसर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होण्यास या पुलाचा फायदा होणार आहे. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम पुढे नेण्यास मदत झाल्याने भविष्यात लोकल रेल्वे सेवांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

रेल्वे पुलाच्या कामासाठी सुमारे ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यांसाठी सुमारे ३१.६२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एलबीएस मार्ग आणि संत रोहिदास मार्गावर भुयारी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाला गती -
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरीपर्यंत उभारण्यात आलेला उड्डाणपूल पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सक्षम करणार आहे. सुमारे १.२६ किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा हा पूल रत्नागिरी हॉटेल जंक्शन, ए. के. वैद्य मार्ग आणि फिल्म सिटी रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल.

या प्रकल्पामुळे प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत पोहोचणेही अधिक सुलभ होणार आहे. पूर्वनिर्मित काँक्रीट सेगमेंट्स आणि वक्राकार पोलादी स्पॅनचा वापर करून या पुलाची रचना करण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबईकरांचा वेळ वाचवणारे विश्वासाचे सेतू – महापौर रितू तावडे -
मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, लोकार्पण करण्यात आलेले तीन उड्डाणपूल हे केवळ सिमेंट आणि लोखंडाचे प्रकल्प नसून वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या मुंबईकरांचा मौल्यवान वेळ वाचवणारे विश्वासाचे सेतू आहेत. सकाळी कामासाठी घराबाहेर पडणारा नागरिक संध्याकाळी सुरक्षितपणे आणि वेळेत घरी पोहोचणे, हेच विकासाचे खरे फलित आहे.

शीवचा ११२ वर्षे जुना पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागल्यानंतर निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वे आणि महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. नियोजित वेळेच्या चार महिने आधी पुलाचे काम पूर्ण होणे ही उल्लेखनीय बाब आहे. विद्याविहारमधील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार असून, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका केवळ रस्ते आणि पूल उभारत नसून मुंबईकरांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त प्रवास, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘पादचारी प्रथम’ धोरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘हरित मुंबई’ या त्रिसूत्रीवर भर दिला जात असल्याचे महापौरांनी नमूद केले. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी मेहनत घेणाऱ्या महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगारांचे त्यांनी आभार मानले.

वेळ आणि इंधनाची बचत होणार – उपमहापौर संजय घाडी....
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी चांगले रस्ते, पूल, जोड रस्ते आणि भूमिगत बोगद्यांची उभारणी आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या दृष्टीने अनेक प्रकल्प हाती घेतले असून, तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले.

दहिसरपासून मुंबईच्या विविध भागांत प्रवास करताना नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि प्रवासात बराच वेळ खर्च होतो. हा वेळ वाचविण्यासाठी महानगरपालिकेकडून जोड रस्ते, पूल आणि भूमिगत बोगद्यांची कामे केली जात आहेत. नव्या उड्डाणपुलांमुळे प्रवासाचा कालावधी कमी होण्याबरोबरच इंधनाचीही बचत होईल. मुंबईकरांच्या सेवेत हे प्रकल्प समर्पित करताना आनंद होत असल्याचे घाडी यांनी नमूद केले.

समन्वयातून प्रकल्पांना गती -
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्य शासन, केंद्र शासन आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयामुळे मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण होत असल्याचे सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासन, अभियंते, अधिकारी, कंत्राटदार आणि कामगारांचे अभिनंदन केले.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकात या तीन पुलांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत असून, नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा प्रवास उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

या तीन प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यास, पूर्व-पश्चिम संपर्क सुधारण्यास आणि रेल्वे वाहतुकीच्या भविष्यातील विस्ताराला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS