Mumbai प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी Central Railwayचा आज ‘रेल्वे जन संवाद’ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2026

Mumbai प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी Central Railwayचा आज ‘रेल्वे जन संवाद’


मुंबई JPN NEWS - प्रवाशांच्या समस्या, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी ‘रेल्वे जन संवाद’ उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव हे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे या उपक्रमाचे नेतृत्व करतील. तर, केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग तसेच पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक आपापल्या विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह या उपक्रमाचे नेतृत्व करतील. मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांवर प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी ३०० हून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या समस्यांचे तीन श्रेणींत वर्गीकरण -
या उपक्रमादरम्यान प्रवाशांच्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय पद्धतशीरपणे नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर समस्यांचे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाईल.

अल्पकालीन समस्यांवर तातडीने किंवा कमी कालावधीत उपाययोजना करण्यात येतील. मध्यमकालीन समस्यांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन आणि अंमलबजावणी केली जाईल. तर, दीर्घकालीन समस्यांमध्ये धोरणात्मक बदल, व्यापक नियोजन किंवा वरिष्ठ प्राधिकरणांच्या मंजुरीची आवश्यकता असलेल्या बाबींचा समावेश असेल.

स्वच्छता विशेष मोहिमेचाही भाग - 
२ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भारतीय रेल्वेमध्ये ‘स्वच्छता विशेष मोहीम-६’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्वच्छता, जागेचे योग्य व्यवस्थापन, भंगार आणि ई-कचऱ्याची विल्हेवाट तसेच नागरिकांचा सहभाग यावर भर देण्यात आला आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून देशभरातील सात हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवर ‘रेल्वे जन संवाद’ आयोजित करण्यात येणार असून, त्याच दिवशी स्वच्छता मोहीमही राबविण्यात येईल.

‘जन की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात तरुणांच्या सहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तरुण प्रवाशांना आपले विचार मांडण्याची संधी देऊन रेल्वे सेवांमधील अडचणींवर व्यावहारिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्रवाशांशी सातत्यपूर्ण संवाद, तक्रारींचे नियोजनबद्ध निराकरण आणि नागरिकांचा सहभाग वाढवून रेल्वे सेवा अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रवाशांसाठी अनुकूल करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS