
मुंबई JPN NEWS - मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाचा यामध्ये समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता दृकश्राव्य माध्यमातून या पुलांचे लोकार्पण होणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संबंधित उड्डाणपुलांच्या ठिकाणी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
विद्याविहारचा प्रवास ३० मिनिटांवरून १० मिनिटांवर -
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या पुलामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून सुमारे १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामध्ये रेल्वे रुळांवरील पूल, पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच मार्ग तसेच सेवा रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. रेल्वे स्थानकातील काही सुविधांचे पुनर्बांधकाम आणि सोमय्या नाल्याचे विस्तारीकरणही प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.
शीवचा ११२ वर्षे जुना पूल नव्या स्वरूपात -
शीव रेल्वे स्थानकाजवळील जुना पूल सुमारे ११२ वर्षे जुना असून असुरक्षित ठरल्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
नव्या पुलामुळे रेल्वे मार्गिकांच्या विस्तारातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. परिणामी उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र विविध तांत्रिक अडचणींवर मात करून ते चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला महत्त्वाची जोडणी -
गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ उभारण्यात आलेला १.२६ किलोमीटर लांबीचा, तीन बाय तीन मार्गिकांचा उड्डाणपूल गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्गापासून दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
या पुलामुळे गोरेगाव पूर्व परिसरातील प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे दोन्ही उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे तीन उड्डाणपूल शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे मानले जात आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.


No comments:
Post a Comment