
मुंबई JPN NEWS - म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने कीटकनाशक विभागातील कामगार व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कामगारांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत कामगारांच्या चौक्यांची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला. बी, ई, डी, एफ दक्षिण, जी उत्तर, एफ उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम, एल, एम पश्चिम आणि के पूर्व विभागातील नादुरुस्त चौक्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कामगारांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले.
लॉकर, गणवेश आणि साबण-टॉवेलचा प्रश्न -
युनियनच्या मागणीनुसार कामगार व कर्मचाऱ्यांना नवीन आणि मोठ्या आकाराचे लॉकर्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच सर्व विभागांतील कामगारांना गणवेश, शिलाई भत्ता आणि धुलाई भत्त्याबाबतच्या त्रुटी दूर करून थकबाकीसह लाभ लागू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. परिपत्रकानुसार प्रत्येक कामगाराला दरमहा ४ साबण (२ कार्बोलिक आणि २ बार सोप) तसेच टॉवेल नियमितपणे मिळावा, यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात येणार आहेत.
फॉगिंग मशीन व आवश्यक साहित्य तातडीने देणार -
डास प्रतिबंधक कामांसाठी आवश्यक असलेली फॉगिंग मशीन तसेच थैली, बॅटरी, सॅम्पल बॉटल, जाळी आणि सॉस पॅन यांसारखे साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
कालबद्ध पदोन्नतीच्या प्रकरणांना गती -
कामगारांच्या १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेतील (कालबद्ध पदोन्नती) प्रलंबित प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही करून ती तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच SFW आणि DSI पदोन्नतीची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
खाडाबदली कामगारांच्या नियुक्ती दिनांकामध्ये झालेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करून योग्य नोंद सेवा अभिलेखात (SR) घेण्यात यावी आणि परिपत्रकानुसार सेवासातत्याचा लाभ मिळावा, याबाबतही योग्य कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केले.
घाणभत्ता आणि प्रलंबित देयकांवरही चर्चा -
पूर्वी कामगारांना मिळणारा घाणभत्ता पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय सेवानिवृत्त, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र आणि मृत कर्मचाऱ्यांच्या तसेच DC-1 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित देयकांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी युनियनने केली.
अतिरिक्त कामाच्या बदल्यात C-Off मिळण्याच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. इतर प्रलंबित मागण्यांवर संबंधित विभागाकडून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कामगारांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रशासनाने अनेक मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत युनियनचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला उपकीटकनाशक अधिकारी, सहायक कीटकनाशक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य लिपिक यांच्यासह युनियनचे सहायक सरचिटणीस प्रदीप नारकर, चिटणीस महेश दळवी, संघटक विठ्ठल गावडे, कीटकनाशक विभागातील तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कामगार व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment