नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची खंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2026

नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची खंत






मुंबई JPN NEWS - नशेचे व्यसन एकदा शरीर आणि मनात रुजले की त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. उपचारांनंतरही व्यसनाचे दुष्परिणाम अनेकदा दीर्घकाळ जाणवत राहतात. त्यामुळे नशा हा केवळ व्यक्तीच्या आरोग्याला नव्हे, तर संपूर्ण समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे, अशी खंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना कॅम्पसमधील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम, किशोरावस्थेतील मानसिक व सामाजिक बदल तसेच योग्य निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बोलताना लोढा यांनी सांगितले की, मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक समजावून सांगण्याबरोबरच आता ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’ यातील फरकही समजावून देणे आवश्यक आहे. चुकीच्या संगतीमुळे अनेकदा मुले व्यसनाच्या मार्गावर जाऊ शकतात. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांकडे संवेदनशीलतेने लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली असून हे अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, विविध संस्था-संघटना आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उल्लेखनीय कामाची यावेळी दखल घेण्यात आली. अभियानात उत्तम योगदान देणाऱ्या २१ व्यक्ती व संस्थांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथही घेतली.

नशा आणि गुन्हेगारी यांच्यातील संबंधाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे लोढा यांनी सांगितले. आधुनिक काळातील युद्धाचे स्वरूप बदलले असून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याबरोबरच त्या देशातील तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात अडकवणे हेही गंभीर आव्हान ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. एका कुटुंबातील तरुण व्यसनाधीन झाल्यास त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक आयुष्यावर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचा विकास वेगाने होत असताना शहराला अमली पदार्थांच्या विळख्यापासून सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘ड्रग्स फ्री भारत’चा संकल्प व्यक्त केला आहे. विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याने युवकांनी व्यसनापासून दूर राहून ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन लोढा यांनी केले.

कार्यक्रमात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी विद्यार्थ्यांना ‘किशोरावस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. ब्रह्मकुमारी प्रशांती यांनी ‘Be Smart, Be Strong Within’ या विषयातून विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या आणि चुकीच्या गोष्टींमधील योग्य निवड कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस अधिकारी, विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS