
मुंबई JPN NEWS - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR-२०२६) प्रारूप मतदार यादीसंदर्भात एकाच दिवशी नमुना ७ चे २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावी विधानसभा मतदारसंघातील एका व्यक्तीविरोधात धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, निर्धारित नियमांचे उल्लंघन करून खोटी व चुकीची माहिती देत अर्ज दाखल केल्याचा आरोप आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, नमुना ७ चे जास्तीत जास्त १० अर्ज प्रतिदिन दाखल करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, १७८-धारावी विधानसभा मतदारसंघात गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले.
जयस्वाल हे धारावी पूर्व येथील ९० फूट मार्गावरील गंगाधरलाल चाळीतील रहिवासी आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या कलमानुसार, मतदार यादीशी संबंधित अर्ज किंवा घोषणेमध्ये जाणूनबुजून खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.


No comments:
Post a Comment