Mumbai दसऱ्याच्या दिवशी कुर्ल्यातील कोहिनूर इमारतीला आग; नऊ जण रुग्णालयात दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2026

Mumbai दसऱ्याच्या दिवशी कुर्ल्यातील कोहिनूर इमारतीला आग; नऊ जण रुग्णालयात दाखल


मुंबई JPN NEWS - दसरा सणाच्या दिवशी कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर स्कूलजवळ असलेल्या कोहिनूर एचडीआयएल इमारत क्रमांक ५ मध्ये आज (२० ऑक्टोबर) सकाळी आग लागल्याची घटना घडली. या घटनेत धुरामुळे आठ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एका व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या नऊ जणांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर एचडीआयएल इमारत क्रमांक ५ मध्ये आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलासह संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात आली.

ही आग तळमजला अधिक १२ मजले असलेल्या इमारतीतील इलेक्ट्रिक डक्टमधील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे तसेच विविध मजल्यांवरील लोखंडी दरवाजांपुरती मर्यादित होती. आगीमुळे परिसरात धूर पसरला. या धुराचा त्रास झाल्याने आठ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. याशिवाय एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली.

रुग्णालयात दाखल नऊ जणांची नावे - 
राजावाडी रुग्णालयाच्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१. इशान अहमद (३० वर्षे) — धुरामुळे त्रास.
२. मोहम्मद शेख (५ वर्षे) — धुरामुळे त्रास.
३. फरीना बोनो (२७ वर्षे) — धुरामुळे त्रास.
४. एजास अहमद (६५ वर्षे) — धुरामुळे त्रास.
५. फरीन शेख (१८ वर्षे) — धुरामुळे त्रास.
६. नायदया शेख (१४ वर्षे) — धुरामुळे त्रास.
७. कलिमा सहा (४५ वर्षे) — धुरामुळे त्रास.
८. अलिना शेख (१७ वर्षे) — धुरामुळे त्रास.
९. जाहेद अली शेख (५५ वर्षे) — उजव्या पायाला दुखापत.
या सर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

अग्निशमन दलासह विविध यंत्रणांकडून मदतकार्य - 
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दसऱ्याच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंता निर्माण झाली. मात्र, आग वेळेत आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS