
मुंबई JPN NEWS - शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सात रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटला प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महापालिकेने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत आवश्यक उपाययोजना करून त्रुटी दूर न केल्यास संबंधित प्लांटवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या ‘एन’ विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी या सातही प्लांटला वायू प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या स्थळपाहणीत विविध उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी संबंधित प्लांटला दुसऱ्यांदा इशारा पत्रे बजावण्यात आली.
धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी -
स्थळपाहणीदरम्यान वाहनांचे टायर धुण्याची व्यवस्था, प्लांटभोवती हिरव्या कापडाचे आच्छादन, धूळ नियंत्रणासाठी फॉगिंग व पाण्याची फवारणी तसेच परिसरातील स्वच्छता यांसारख्या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्या. यापूर्वी निर्देश देऊनही या उपाययोजनांची समाधानकारक अंमलबजावणी झाली नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सात दिवसांची मुदत; अन्यथा कठोर कारवाई -
संबंधित सातही आरएमसी प्लांटला नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा अनुपालन अहवाल छायाचित्रांसह सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत नियमांचे पालन न केल्यास लागू कायद्यांनुसार संबंधित प्लांटविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या ‘एन’ विभागाने दिला आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यामुळे घाटकोपरमधील संबंधित आरएमसी प्लांट निर्धारित मुदतीत त्रुटी दूर करतात का, याकडे लक्ष लागले आहे.



No comments:
Post a Comment