इंडिगोचा विमान प्रवास महागला; देशांतर्गत तिकिटांवर ₹375 ते ₹1,300 इंधन अधिभार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2026

इंडिगोचा विमान प्रवास महागला; देशांतर्गत तिकिटांवर ₹375 ते ₹1,300 इंधन अधिभार



नवी दिल्ली JPN NEWS - विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने विमान इंधनाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधन अधिभारात वाढ केली आहे. सुधारित अधिभार 6 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून, देशांतर्गत प्रवासासाठी अंतरानुसार प्रवाशांना आता 375 रुपयांपासून 1,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. (IndiGo Raises Fuel Surcharge)

कंपनीने देशांतर्गत मार्गांसाठी प्रवासाच्या अंतरानुसार इंधन अधिभाराचे वेगवेगळे स्लॅब निश्चित केले आहेत. 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 375 रुपये, 501 ते 1,000 किलोमीटरसाठी 600 रुपये, 1,001 ते 1,500 किलोमीटरसाठी 900 रुपये, 1,501 ते 2,000 किलोमीटरसाठी 1,150 रुपये, तर 2,000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी 1,300 रुपये इंधन अधिभार आकारला जाणार आहे.

इंडिगोने मार्चमध्ये इंधन अधिभार लागू केल्यानंतर त्यात केलेली ही आणखी एक वाढ आहे. वाढत्या एटीएफच्या किमतीमुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चावर मोठा परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही अतिरिक्त भार - 
देशांतर्गत उड्डाणांबरोबरच आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही इंधन अधिभारात वाढ करण्यात आली आहे. सार्क देशांसाठी 1,000 ते 3,000 रुपये, आफ्रिकेतील मार्गांसाठी 6,000 रुपये, युरोपसाठी 10,000 रुपये, तर आग्नेय आशिया, जीसीसी, मध्य पूर्व तसेच उत्तर आणि पूर्व आशियातील मार्गांसाठी 5,500 रुपये अधिभार आकारला जाणार आहे.

एटीएफच्या वाढत्या किमतीचा परिणाम - 
मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती आणि विमान इंधनाच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अलीकडे एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच एटीएफच्या किमतीत 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने विमान कंपन्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

विमान कंपनीच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वाढलेल्या इंधन खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी इंधन अधिभारात बदल करणे आवश्यक झाल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
दररोज 2,200 हून अधिक उड्डाणे

इंडिगोची देशभरात आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर दररोज 2,200 हून अधिक उड्डाणे चालतात. त्यामुळे नव्या इंधन अधिभाराचा परिणाम मोठ्या संख्येने विमान प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या देशांतर्गत प्रवासासाठी तिकिटाच्या मूळ किमतीव्यतिरिक्त आता 1,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.

विमान इंधनाच्या किमतीतील वाढ आणखी कायम राहिल्यास भविष्यात विमान कंपन्यांकडून तिकिटांच्या दरात किंवा इंधन अधिभारात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS