Mumbai Best बसमध्ये कोळी महिलांना प्रवेश नाकारल्याचा आरोप; मोर्चाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2026

Mumbai Best बसमध्ये कोळी महिलांना प्रवेश नाकारल्याचा आरोप; मोर्चाचा इशारा


मुंबई JPN NEWS - मासळीच्या टोपल्या असल्यामुळे बेस्ट बसचे चालक बस थांबवत नसल्याचा आणि कोळी महिलांना बसमध्ये चढण्यास अडथळे येत असल्याचा आरोप मच्छिमार महिलांनी केला आहे. मासळी विक्रीसाठी दररोज पहाटे बाजारात जाणाऱ्या महिलांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, बेस्ट प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास मोर्चा काढण्याचा इशारा उबाठाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी दिला आहे.

कोळी महिलांच्या म्हणण्यानुसार, खारदांडा येथून क्रॉफर्ड मार्केटमध्ये मासळी आणण्यासाठी त्यांना दररोज प्रवास करावा लागतो. मात्र, या मार्गावर बसची संख्या अपुरी असून उपलब्ध बसही वेळेवर येत नसल्याची त्यांची तक्रार आहे. मासळीच्या टोपल्या पाहून बेस्टचे चालक बस थांबवत नसल्याचा आरोपही महिलांनी केला. त्यामुळे त्यांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो आणि प्रवासासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात.

मासळीच्या वासाचे कारण देत रिक्षाचालक प्रवास नाकारतात, तर लोकलमधून मासळी घेऊन जाण्यासही अडचणी येतात, असे महिलांनी सांगितले. अनेक कोळी महिला वयोवृद्ध असून, त्यांना धावत्या बसमध्ये चढणे शक्य नसते. त्यामुळे बस थांबवून त्यांना चढण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोळी महिलांनी सांगितले की, कुलाबा ते वांद्रे टॅक्सीने जाण्यासाठी सुमारे ८०० रुपये खर्च येतो. याउलट बसने प्रवास केल्यास तिकीट आणि मालाचे शुल्क मिळून सुमारे ५० रुपये खर्च होतो. मात्र, बस न थांबल्यामुळे पर्यायी वाहनांचा वापर करावा लागतो आणि त्याचा आर्थिक भार महिलांवर पडतो.

या प्रश्नावर संताप व्यक्त करताना काही कोळी महिलांनी बस थांबवली नाही किंवा बसमध्ये चढू दिले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. संतप्त महिलांनी हातात कोयते घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने या प्रश्नावरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, उबाठाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी सांगितले की, कोळी महिला पहाटे चार वाजल्यापासून मासळी खरेदीसाठी धक्क्यावर जातात. त्यानंतर मासळी बाजारात नेण्यासाठी त्यांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. या मार्गावर बेस्ट बसची संख्या कमी असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. बेस्ट प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढला नाही, तर कोळी महिलांना सोबत घेऊन बेस्टविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS