
मुंबई JPN NEWS - मुंबईत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०२५ मध्ये शहरात कुत्रा चावल्याच्या तब्बल १ लाख ५४ हजार १७ घटनांची नोंद झाली. म्हणजेच दररोज सरासरी ४२१ आणि दर तासाला जवळपास १७ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. २०२१ मधील आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मिळविलेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. २०२१ मध्ये मुंबईत कुत्रा चावल्याच्या ७९ हजार २५२ घटनांची नोंद झाली होती. त्यावेळी दररोज सरासरी २१७, तर दर तासाला सुमारे नऊ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद होती. २०२२ मध्ये हा आकडा वाढून १ लाख ६ हजार ७९७ झाला. त्यानंतर २०२३ मध्ये घटनांची संख्या घटून ६१ हजार ३३२ वर आली. मात्र, २०२४ मध्ये पुन्हा वाढ होऊन १ लाख २८ हजार २५२ घटना नोंदवण्यात आल्या. २०२५ मध्ये ही संख्या आणखी वाढून १ लाख ५४ हजार १७ वर पोहोचली.
गेल्या पाच वर्षांत मुंबईत कुत्रा चावण्याच्या एकूण ५ लाख २९ हजार ६५० घटनांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी सुमारे २९० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. विशेषतः २०२३ मध्ये घटनांमध्ये घट झाल्यानंतर २०२४ आणि २०२५ मध्ये झालेली मोठी वाढ चिंताजनक मानली जात आहे.
आरटीआयच्या उत्तरानुसार, कुत्रा चावल्यामुळे किंवा कुत्रा चावल्यानंतर रेबीज झाल्यामुळे कोणत्याही मृत्यूची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कुत्रा चावण्याच्या घटनांची वाढती संख्या आणि रेबीज प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याबाबत समोर येणाऱ्या वृत्तांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही गंभीर बाब असल्याचे सांगत, कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची परिणामकारकता वाढविणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त होत आहे.


No comments:
Post a Comment