Crime थकित वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी ३५ हजारांची लाच, नायगावमधील वरिष्ठ पोलीस लिपिक ACBच्या जाळ्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2026

Crime थकित वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी ३५ हजारांची लाच, नायगावमधील वरिष्ठ पोलीस लिपिक ACBच्या जाळ्यात


मुंबई JPN NEWS - थकित वेतनाचे बिल तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्याच्या कामासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबईतील नायगाव येथील एल विभागातील वरिष्ठ लिपिक बद्रीनाथ शिवहरी थोरवे (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाईदरम्यान ताब्यात घेतले. तक्रारदाराकडून यापूर्वी फोन-पेद्वारे १० हजार रुपये स्वीकारल्याचा, तसेच कारवाईदरम्यान आणखी ५ हजार रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ACBकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदार २९४ दिवस वैद्यकीय रजेवर होते. या कालावधीत त्यांचे वेतन बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते कामावर रुजू झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या वैद्यकीय रजेपैकी २४८ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली, तर उर्वरित दिवस विनावेतन करण्यात आले. मंजूर रजेच्या कालावधीतील थकीत वेतनाचे बिल तयार करून ते कोषागारात पाठविणे आणि मंजूर करून घेण्यासाठी वरिष्ठ लिपिकाने ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराने यापैकी १० हजार रुपये फोन-पेद्वारे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, उर्वरित लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई ACBकडे लेखी तक्रार दाखल केली.

ACBने १६ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान संबंधित लोकसेवकाने यापूर्वी घेतलेल्या १० हजार रुपयांव्यतिरिक्त आणखी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून दुसऱ्या हप्त्यापोटी ५ हजार रुपये स्वीकारताना थोरवे यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती ACBच्या अहवालात देण्यात आली आहे.

या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अहवालात नमूद आहे. आरोपीच्या घराची झडती आणि पुढील कायदेशीर कारवाईही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मच्छीद्र दिवे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मोरे आणि त्यांच्या पथकाने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कारवाईला मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. नागरिक हेल्पलाइन क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८८२८२४१०६४ वर संपर्क साधू शकतात.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS