Mumbai झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना रोखण्यासाठी वृक्षांची योग्य निगा राखा; पालिकेचे मुंबईकरांना आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2026

Mumbai झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना रोखण्यासाठी वृक्षांची योग्य निगा राखा; पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई JPN NEWS - मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये झाडे तसेच त्यांच्या फांद्या पडण्याच्या घटना रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना वृक्षांची योग्य निगा राखण्याचे आवाहन केले आहे. बदलते हवामान, वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यांमुळे झाडांवर ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, झाडांना आवश्यकतेनुसार पाणी देणे, नियमित देखभाल करणे आणि धोकादायक झाडांची माहिती वेळेत पालिकेला कळविणे गरजेचे असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच नागरिकांना सावली आणि शुद्ध हवा देण्यात वृक्षांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, झाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पाण्याची कमतरता असताना झाडांना गरजेनुसार पाणी मिळेल, याचे नियोजन नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांनी करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

झाडांना पाणी देताना पिण्याच्या पाण्याचा वापर टाळा - 
झाडांना पाणी देण्यासाठी शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केलेले, झाडांसाठी योग्य आणि सुरक्षित असलेले पुनर्वापरयोग्य पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे. इतर वापरानंतर उपलब्ध होणारे सुरक्षित पाणीही आवश्यक ती काळजी घेऊन झाडांसाठी वापरता येऊ शकते. पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा नियोजनबद्ध वापर केल्यास जलसंधारणाला मदत होण्याबरोबरच वृक्षांचे आरोग्य टिकवून ठेवणे शक्य होईल. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरातील झाडांची संख्या, त्यांची स्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी देण्याचे नियोजन करावे, असे पालिकेने म्हटले आहे.

झाडांच्या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष करू नका - 
झाडे किंवा त्यांच्या फांद्या पडण्याच्या घटना टाळण्यासाठी केवळ पाणी देणे पुरेसे नाही, तर झाडांची नियमित पाहणी आणि योग्य देखभाल करणेही आवश्यक आहे. झाडांचा बुंधा, फांद्यांची मजबुती, कोरडेपणा आणि झाडाच्या एकूण स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. झाडाच्या बुंध्याला भेगा पडणे, झाड एका बाजूला झुकणे, मोठ्या फांद्या सुकणे किंवा तुटण्याच्या स्थितीत असणे, तसेच झाडाची मुळे उघडी पडणे अशी धोक्याची लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा झाडांमुळे नागरिक, पादचारी आणि परिसरातील मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांनी आपल्या परिसरातील झाडांची वेळोवेळी पाहणी करावी. धोकादायक झाडे किंवा कमकुवत फांद्या आढळल्यास त्यांची माहिती तातडीने बृहन्मुंबई महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS