Mumbai धूळ नियंत्रणासाठी महापालिकेची विशेष मोहीम; एका दिवसात ६९.५५ किमी रस्त्यांची स्वच्छता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2026

Mumbai धूळ नियंत्रणासाठी महापालिकेची विशेष मोहीम; एका दिवसात ६९.५५ किमी रस्त्यांची स्वच्छता


मुंबई JPN NEWS - मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या अभियानाच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. या कारवाईत ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकामाचा राडारोडा संकलित करण्यात आला.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही मोहीम २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. रस्त्यांवरील धूळ तसेच बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

२६ प्रशासकीय विभागांतील १४६ रस्त्यांवर लक्ष - 
मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांतील एकूण १४६ रस्त्यांवर स्वच्छता आणि धूळ नियंत्रणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे-कुर्ला जोडमार्ग (बीकेसी कनेक्टर), सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग (एससीएलआर), पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्ग (जेव्हीएलआर), घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव-मानखुर्द मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रमुख मार्गांसह विविध विभागांतील धूळप्रवण रस्ते आणि परिसरातही स्वच्छता केली जात आहे.

धूळ हवेत पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना - 
मोहिमेदरम्यान रस्त्यांची सखोल स्वच्छता, झाडलोट, स्क्रॅपिंग, रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ व गाळ हटविणे, दुभाजक आणि पदपथांची स्वच्छता यावर भर देण्यात येत आहे. धूळप्रवण ठिकाणी पाण्याची फवारणी आणि मिस्टिंग करून धूळ हवेत पसरण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संकलित धूळ, कचरा आणि बांधकाम-पाडकामाच्या राडारोड्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.

५४१ कर्मचारी, ४७१ स्वयंसेवक तैनात -
या मोहिमेसाठी महानगरपालिकेचे ५४१ स्वच्छता कर्मचारी आणि ४७१ स्वयंसेवक कार्यरत होते. स्वच्छतेच्या कामासाठी १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मिस्टिंग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, सहा वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि सहा डिव्हायडर क्लीनिंग मशीनचा वापर करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS