Mumbai अग्निशमन दलाचा १०१ क्रमांक व्यस्त, आता 'या' पाच पर्यायी क्रमांकांवर संपर्क साधा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2026

Mumbai अग्निशमन दलाचा १०१ क्रमांक व्यस्त, आता 'या' पाच पर्यायी क्रमांकांवर संपर्क साधा!


मुंबई JPN NEWS - मुंबईत आग, इमारत कोसळणे, वाहनांचे अपघात, झाडे उन्मळून पडणे किंवा अन्य आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाने १०१ या आपत्कालीन क्रमांकासह पाच पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. दूरध्वनी सेवेतील तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना अग्निशमन दलाशी संपर्क साधताना अडचण येऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही व्यवस्था केली आहे.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ या पर्यायी क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.

मुंबई अग्निशमन दलाचा १०१ हा आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, या सेवेतील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीसाठी मनुष्यबळाची कमतरता यामुळे सेवा खंडित होण्याची शक्यता असते. अशा वेळी आपत्कालीन मदतकार्यात विलंब होऊ नये, यासाठी पर्यायी संपर्क क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

दरवर्षी १५ हजारांहून अधिक आपत्कालीन कॉल - 
मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात दरवर्षी १५ हजारांहून अधिक आपत्कालीन दूरध्वनी प्राप्त होतात. आगीच्या घटनांव्यतिरिक्त इमारती कोसळणे, वाहनांचे अपघात, प्राणी किंवा पक्षी अडकणे, समुद्र अथवा तलावात व्यक्ती बुडणे, झाडे कोसळणे आणि रस्त्यावर तेल सांडणे अशा विविध घटनांमध्ये अग्निशमन दलाकडून तातडीने मदत केली जाते.

१०१ या क्रमांकावरच सर्व संपर्क अवलंबून राहिल्यास मोठ्या दुर्घटनेच्या वेळी अन्य दूरध्वनी कामकाजावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त संपर्क क्रमांकांमुळे नागरिकांना अग्निशमन दलाशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.

मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रे कार्यरत - 
मुंबईकरांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे आगीपासून तसेच अन्य आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल कार्यरत आहे. सध्या मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रे, भायखळा येथे मुख्य नियंत्रण कक्ष, सहा प्रादेशिक समादेश केंद्रे, १९ लघु अग्निशमन केंद्रे आणि २२ जलद प्रतिसाद वाहने कार्यरत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत १०१ या क्रमांकासह उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांकांचा वापर करून अग्निशमन दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS