
मुंबई JPN NEWS - अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरातील खैराणी रोड, अब्दुल रशीद कंपाउंड येथे मंगळवारी (२० ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जण भाजल्याने जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई अग्निशमन दलाला सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायंकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी आगीला लेव्हल-२ घोषित करण्यात आले. या आगीने सुमारे ४,००० बाय ४,००० चौरस फूट क्षेत्रातील ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि चाळीतील काही भागांना वेढले होते. या इमारती तळमजल्याच्या तसेच काही ठिकाणी तळमजला अधिक पहिला मजला अशा स्वरूपाच्या होत्या.
आगीमध्ये विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे, कपड्यांचा साठा, प्लास्टिक ग्रॅन्युल्स, भंगार साहित्य, लाकडी फर्निचर, रिकामे एरोसोल कंटेनर, एलपीजी सिलिंडर, विविध यंत्रसामग्री, शटर, दरवाजे, खिडक्या, पत्रे तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात आली.
या घटनेत झाहिद अब्दुल्ला कुरेशी (वय २०) हे ४० टक्के, तोफिक शादिलाल कुरेशी (वय २०) हे ८० टक्के, लालचंद रामलखन गौतम (वय ४०) हे १० टक्के, तर कमाल जलालुद्दीन शाह (वय ४२) हे ४० टक्के भाजले आहेत. या चौघांवर राजावाडी रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळावरून दोन अज्ञात व्यक्तींचे जळालेले मृतदेह आढळून आले. ते राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेचे संबंधित विभागीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


No comments:
Post a Comment