कार्बन चाचण्यांसाठी मुंबई विद्यापीठाची अत्याधुनिक सुविधा; परदेशावरील अवलंबित्व कमी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2026

कार्बन चाचण्यांसाठी मुंबई विद्यापीठाची अत्याधुनिक सुविधा; परदेशावरील अवलंबित्व कमी होणार


मुंबई JPN NEWS - कार्बन समस्थानिकांच्या चाचण्यांसाठी परदेशातील प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करण्याच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलरेटर सेंटरमध्ये (एमयूएसी) अत्याधुनिक ॲक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (AMS) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्बन समस्थानिकांच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची अस्सलता तपासणे, नैसर्गिक आणि कृत्रिम घटकांमधील फरक ओळखणे तसेच कार्बन-१४ चाचणीद्वारे योग्य नमुन्यांचे कालमापन करणे शक्य होणार आहे. संशोधनासोबतच उद्योग क्षेत्रालाही या सुविधेचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

या अत्याधुनिक सुविधेची माहिती उद्योग क्षेत्राला करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात नुकतेच एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सेंद्रिय नमुन्यांमधील कार्बन समस्थानिकांचा अभ्यास आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञानावर या चर्चासत्रात भर देण्यात आला. यामध्ये शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध उद्योगांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. वर्षा केळकर-माने यांच्या संयोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठात ही सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे भारतातील प्रगत प्रवेगक-आधारित संशोधन सुविधा उपलब्ध असलेल्या मोजक्या संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, या सुविधेमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजांसाठी उपयोगात आणण्याबरोबरच देशांतर्गत संशोधन क्षमताही वाढवता येईल.

नवी दिल्ली येथील आंतरविद्यापीठीय प्रवेगक केंद्राचे संचालक डॉ. अविनाश चंद्र पांडे यांनीही या सुविधेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रगत चाचण्या देशातच करण्याची क्षमता वाढल्यास परदेशातील प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. तसेच संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्याला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

उत्पादनांची अस्सलता तपासण्यास मदत -
कार्बन-१२ आणि कार्बन-१३ या समस्थानिकांचे गुणोत्तर तपासून एखाद्या उत्पादनातील घटकांचे स्वरूप आणि त्यांचे संभाव्य मूळ याविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते. विशेषतः सुगंध आणि स्वाद उद्योगात नैसर्गिक घटक आणि कृत्रिमरीत्या तयार केलेले घटक यांच्यातील फरक ओळखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे उत्पादनांची अस्सलता पडताळणे, गुणवत्ता राखणे आणि ग्राहकांचा विश्वास टिकविणे शक्य होणार आहे.

कार्बन-१४ चाचणीचा उपयोग पुरातत्त्वीय वस्तू तसेच इतर योग्य नमुन्यांचे वय निश्चित करण्यासाठी केला जातो. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्र, पृथ्वी विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि विविध वैज्ञानिक संशोधन क्षेत्रांमध्येही या सुविधेचा उपयोग होऊ शकतो. नमुन्यांचे स्वरूप आणि चाचणीचा उद्देश यानुसार या तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधनासाठी आवश्यक माहिती मिळवता येते.

देशातील संशोधन आणि उद्योग क्षेत्राला चालना -
या चर्चासत्रात टाटा मूलभूत संशोधन संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आणि आयआयटी गांधीनगर येथील तज्ज्ञ सहभागी झाले होते. सुगंध आणि स्वाद उद्योगातील प्रतिनिधी कमलेश शाह आणि मंजुनाथ यांनीही या तंत्रज्ञानाचे औद्योगिक महत्त्व स्पष्ट केले.

प्रा. मयंक वाहिया आणि प्रा. वर्षा केळकर-माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत विविध संशोधन क्षेत्रांतील या तंत्रज्ञानाच्या उपयोगांवर विचारमंथन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेगक केंद्रातील नासीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश वत्स यांनी तंत्रज्ञानाची कार्यपद्धती आणि क्षमता समजावून सांगितली. तर डॉ. सिद्धार्थ कस्तुरीरंगन यांनी या सुविधेचे प्रात्यक्षिक सादर केले.

समारोपप्रसंगी प्रा. वर्षा केळकर-माने यांनी ही सुविधा विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रगत वैज्ञानिक चाचण्यांची देशांतर्गत क्षमता वाढविणे, परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि संशोधनाला उद्योगाच्या गरजांशी जोडणे, या दृष्टीने मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS