
मुंबई JPN NEWS - मुंबईतील पवई तलावाच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजनेला आजपासून निर्णायक टप्पा गाठला आहे. पवई तलावात मिसळणारे मलजलाचे २० प्रवाह अडवून (Intercept) ते मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, १ ऑक्टोबरपासून तलावात मलजल मिसळण्यास पूर्णतः प्रतिबंध झाला आहे.
या कामांतर्गत तब्बल ३ हजार ५६ मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. आदि शंकराचार्य मार्गावरील १८ मलजल प्रवाह गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत. तर पेरूगेट येथील दोन प्रवाह फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत.
पवई तलावात दररोज सुमारे १८ दशलक्ष लीटर मलजल मिसळत असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला होता. वाढते नागरिकरण आणि तलावात येणारे मलजल लक्षात घेऊन महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प आणि मुंबई मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प विभागांनी २० विसर्ग बिंदूंची पाहणी करून ही उपाययोजना हाती घेतली.
१३ महिन्यांत काम पूर्ण -
पवई तलावात मलजल मिसळण्यास प्रतिबंध करण्याच्या या प्रकल्पाची सुरुवात ऑगस्ट २०२५ मध्ये करण्यात आली होती. निर्धारित वेळेच्या तुलनेत अवघ्या १३ महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी ३० सप्टेंबर रोजी प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
पवई तलाव हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसंस्था असल्याने त्याची जल गुणवत्ता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे बांगर यांनी सांगितले. तलावात मिसळणारे मलजल थांबल्यामुळे जलप्रदूषणाबरोबरच जलपर्णीच्या वाढीलाही आळा बसण्याची अपेक्षा आहे.
जलपर्णी हटविण्याचे कामही सुरू -
पवई तलावातील जलपर्णी हटविण्याचे कामही महापालिकेकडून सुरू आहे. सध्या दोन हार्वेस्टरच्या माध्यमातून जलपर्णी काढण्यात येत आहे. तलावातील जलपर्णीचे अंदाजित प्रमाण २४ हजार मेट्रिक टन असून, २९ सप्टेंबरपर्यंत २० हजार ३४० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ८५ टक्के जलपर्णी हटविण्यात आली आहे.
२०२७ पर्यंत आणखी एक आधुनिक STP -
पवई येथील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर दररोज ८ दशलक्ष लीटर क्षमतेचे आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात प्रक्रिया केलेले सुमारे ८ दशलक्ष लीटर शुद्ध पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे.
या केंद्राचे काम निविदेनुसार डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करायचे असले, तरी मे २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे केंद्र सुरू झाल्यानंतर ८ दशलक्ष लीटर मलजल या केंद्राकडे, तर उर्वरित ८ दशलक्ष लीटर मलजल भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, तलावातील विद्यमान पाण्यातील सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी करून जलगुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा अभ्यास सुरू आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment