‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २.५९ लाख नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2026

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २.५९ लाख नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ


मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष आरोग्य मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल २ लाख ५९ हजार ६ नागरिकांनी विविध मोफत वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि मुंबई महापौर वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या २५५ आरोग्य शिबिरांसह महापालिकेचे १८९ दवाखाने, २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (HBT) आपला दवाखाने आणि ८३ नागरी प्राथमिक आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान मुंबईत ५ हजार ७४० आरोग्य तपासणी सत्रे घेण्यात आली. यामध्ये १ लाख ३८ हजार ४९२ पुरुष आणि १ लाख २० हजार ५१४ महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

गणेश मंडपांमध्येही आरोग्य तपासणी - 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने आयोजित २५५ शिबिरांमध्ये ११ हजार २१८ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या १८९ दवाखान्यांमध्ये ८४ हजार १४२, HBT आपला दवाखान्यांमध्ये ८३ हजार ६१ आणि ८३ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ३७ हजार ७२७ नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. याशिवाय विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेल्या असंसर्गजन्य रोग निदान तपासणीचा ४२ हजार ८५८ नागरिकांनी लाभ घेतला.

टीबी, मलेरिया आणि गॅस्ट्रोचीही तपासणी - 
मोहिमेदरम्यान २१ हजार ४०५ नागरिकांची ताप तपासणी, १ हजार ३२६ अतिसार अर्थात गॅस्ट्रो रुग्णांची तपासणी आणि ४ हजार ७५२ संशयित क्षयरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. मलेरियाच्या निदानासाठी १५ हजार ४४९ रक्त नमुने घेण्यात आले.

हजारो नागरिकांमध्ये आजारांचे वेळीच निदान - 
असंसर्गजन्य आजारांच्या लवकर निदानावरही या मोहिमेत विशेष भर देण्यात आला. ३२ हजार ४२८ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १ हजार ६६० नवीन उच्च रक्तदाब रुग्णांचे निदान झाले. त्याचप्रमाणे २२ हजार ८०५ नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ५७ नवीन मधुमेह रुग्णांची ओळख पटली. पुढील तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असलेल्या २ हजार २२९ रुग्णांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले.

महापौर रितू तावडे यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल गणेशोत्सव मंडळे, मुंबईकर नागरिक तसेच महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे आभार मानले. गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तिभावासोबतच आरोग्याची भेट मिळावी, या उद्देशाने गणेशोत्सव मंडपांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहिले. या मोहिमेमुळे अनेक आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान होऊन नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाल्याचे महापौरांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS