
मुंबई JPN NEWS - मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरलेला दिग्दर्शक संतोष दावखर यांचा ‘गोंधळ’ हा लोक-थ्रिलर चित्रपट १३ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दावखर फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती संतोष दावखर यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी, पारंपरिक लोकसंस्कृती, गूढ वातावरण आणि मानवी नात्यांतील गुंतागुंत यांची सांगड या चित्रपटात घालण्यात आली आहे.
लोकपरंपरेच्या पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार -
‘गोंधळ’ची कथा सुमन या तरुणीभोवती फिरते. दुःखी वैवाहिक जीवनातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणारी सुमन, तिचा प्रियकर सरजेराव याच्या पारंपरिक गोंधळ विधीबद्दलच्या तीव्र आसक्तीचा वापर करते. रात्रीच्या अंधारात पार पडणाऱ्या या विधीदरम्यान गावातील सत्तासंघर्ष, लपलेले हेतू आणि विश्वासघात यांचे धागे उलगडू लागतात. एका पवित्र धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्याचे रूपांतर रहस्य आणि गुन्हेगारीने भरलेल्या घटनाक्रमात होते. पहाट होण्यापूर्वी सत्य समोर येणार का, हा प्रश्न चित्रपटातील उत्कंठा वाढवतो.
संतोष दावखर यांची भावना -
चित्रपटाच्या ऑस्करसाठी झालेल्या निवडीबद्दल आणि देशव्यापी प्रदर्शनाबद्दल संतोष दावखर यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या मातीची अस्सल संस्कृती, तिची गूढ लय आणि आजवर फारशा न मांडलेल्या पैलूंशी प्रामाणिक राहणे, हे चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
भावना प्रामाणिक असतील, तर भाषेच्या सीमा कलाकृतीचा प्रवास रोखू शकत नाहीत, अशी भावना व्यक्त करत त्यांनी सहा भाषांमधून हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दिग्गज कलाकार आणि संगीताची साथ -
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, छायाचित्रणाची जबाबदारी अमलेंदू चौधरी यांनी सांभाळली आहे.
मराठी लोकपरंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण विधी, ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव आणि उत्कंठावर्धक कथानक यांचा संगम असलेला ‘गोंधळ’ आता देशव्यापी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरलेल्या या चित्रपटाला विविध भाषांतील प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment