
मुंबई JPN NEWS - नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय स्पर्धेच्या अर्जाची अंतिम मुदत आता ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड तसेच दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशातून २९ हजारांहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तिचे आयोजन केले जात आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख आधी १७ ऑक्टोबर होती. मात्र, वाढता प्रतिसाद पाहता मुदत वाढवण्यात आली आहे.
विविध क्षेत्रांतील समस्यांवर नवकल्पना मांडण्याची संधी -
कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा, नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा विविध क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, उद्योजक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि संशोधन गटांना यात सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत जिल्हानिहाय पारितोषिकांचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कल्पना प्रत्यक्षात आणू इच्छिणाऱ्या तरुणांना आपले प्रकल्प सादर करण्याची आणि त्यांना व्यापक स्तरावर ओळख मिळवून देण्याची संधी मिळणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विद्यार्थी, उद्योजक आणि नवोन्मेषकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीला आणि पारितोषिक वितरण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारल्याचे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल? -
इच्छुक उमेदवारांना "sevainnovationchallenge.in" (https://sevainnovationchallenge.in) या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्जाच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहिती भरावी लागेल. त्यानंतर प्रकल्प सादर करताना आधारशी संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पासंबंधी आवश्यक तपशील द्यावे लागतील. अर्ज प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर क्यूआर कोड आणि शंकांचे निरसन करण्यासाठी चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment