
मुंबई JPN NEWS - अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळी आणि सार्वजनिक रस्त्यांवर फटाके न फोडण्याबाबतच्या जनजागृती व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर केलेल्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिया मिर्झाची माफी मागावी आणि मुंबई महापालिकेने तिचा जनजागृतीपर व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
दिया मिर्झाने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या जनजागृतीच्या संदेशाला भाजपने धार्मिक रंग दिला. अभिनेत्री हिंदूविरोधी असल्याचे कथानक पसरवून तिच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात आले. तसेच भाजपच्या दबावामुळे मुंबई महापालिकेने हा व्हिडिओ हटविल्याचा आरोप रईस शेख यांनी केला. प्रदूषणासारख्या सार्वजनिक प्रश्नावर धार्मिक राजकारण करणे चुकीचे असून, विशिष्ट धर्मीयांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे या प्रकरणातून दिसून येते, असेही ते म्हणाले.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी दिया मिर्झाच्या विरोधात केलेल्या विधानांबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही शेख यांनी केली. पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देणे चुकीचे नसून, अशा जनजागृती मोहिमांना राजकीय किंवा धार्मिक वादात ओढू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिया मिर्झाचा व्हिडिओ कोणत्या कारणामुळे हटविण्यात आला, याचा जाहीर खुलासा करावा. तसेच हा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पुन्हा अपलोड करावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment