
मुंबई JPN NEWS - वडाळा लोढा जंक्शन येथे BEST बस, चलो प्रीमियम बस आणि अन्य वाहनांचा समावेश असलेल्या साखळी अपघातातील जखमींच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्या टेम्पो चालकाची प्रकृती गंभीर असून त्याला सायन रुग्णालयातील ट्रॉमा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार तो बेशुद्ध असून उपचारांना प्रतिसाद देत नाही. अन्य चार जखमींची प्रकृती सध्या सामान्य असल्याचे वाहतूक नियंत्रण कक्षाने कळविले आहे.
वाहतूक विभागाचे अपघात निरीक्षक क्रमांक ०११५८५, मसूरकर यांनी सकाळी ९.५० वाजता सायन रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक हसरत अली शेख (वय २८) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ट्रॉमा आयसीयू, ई वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
अर्टिगा कारमधील शिवानी पाल (वय ६३) यांच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि डाव्या कानाला दुखापत झाली आहे. त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून प्लास्टर करण्यात आले आहे. डाव्या कानावर ११ टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या सामान्य आहे.
त्यांचे पती प्रणेश इंद्र पाल (वय ७५) यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. मुलगी मधु पाल (वय २८) हिच्या डोक्याला आणि डाव्या हाताला दुखापत झाली असून कपाळावर आणि डाव्या पायाच्या गुडघ्याखाली टाके घालण्यात आले आहेत. या दोघांचीही प्रकृती सध्या सामान्य असल्याचे सांगण्यात आले.
अर्टिगा कारचे चालक बालाजी पांडुरंग जाधव (वय ३७) यांच्या डाव्या हाताला तसेच डाव्या पायाच्या शेवटच्या दोन बोटांच्या मधल्या भागात दुखापत झाली आहे. मात्र, फ्रॅक्चर नसल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृतीही सामान्य आहे.
या अपघातातील क्रेटा कारमधील दोघांना यापूर्वी सोमय्या रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे सध्या सायन रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जखमींपैकी चार जणांची प्रकृती सामान्य असून टेम्पो चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment