शिवसेना, भाजपला 'आठवले' इंदू मिल आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2012

शिवसेना, भाजपला 'आठवले' इंदू मिल आंदोलन


मुंबई - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले इंदू मिल जागेसंदर्भातील आंदोलन शिवसेना व भाजपला सध्या आठवले आहे. इंदू मिलची साडेबारा एकर जमीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) 15 ऑक्‍टोबरपासून राज्यात जेलभरो आंदोलन करणार आहे. यात शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई व भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे सहभागी होतील. रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनात युतीचे नेते सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या आंदोलनाबाबत सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. 


इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देण्याच्या मागणीसाठी गेले वर्षभर आंदोलन सुरू आहे. 15 डिसेंबर 2011 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये घुसून मोडतोड केली होती. याआधी 6 डिसेंबर 2011 रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यानी इंदू मिलचा ताबा घेतला होता. सुमारे वर्षभर या प्रश्‍नावर सातत्याने आंदोलने सुरू आहेत, मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महत्त्वपूर्ण आंदोलनाकडे शिवसेना-भाजपने दुर्लक्ष केले होते. दलित समाजाच्या भावना या प्रश्‍नी अतिशय तीव्र असल्याने या प्रश्‍नावर आंदोलनात सहभागी झाल्यास राज्यातील दलित समाजाची सहानुभूती मिळेल व दलित विरोधाचा असलेला शिक्का पुसून काढणे शक्‍य होईल, असा विचार करून या आंदोलनात सहभागी होण्याचा विचार युतीच्या नेतृत्वाने केला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS