मुंबई (प्रतिनिधी)-कुलाबा ते सीप्झ या नियोजित मार्गात अडथळा ठरणारी 254 झाडे तोडली जाणार आहे. मात्र, या वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध केला आहे. तर, सार्वजनिक उपक्रमाला प्राधान्य देण्यासाठी वृक्षतोड होणार असल्याने शिवसेनेचा विरोध का असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.त्यामुळे मेट्रो- 3 च्या वादात युतीच्या फांदीवर कुर्हाड पडण्याची शक्यता आहे.
नव्याने सुरु करण्यात येणार्या अंधेरी सिप्झ – कुलाबा या मेट्रो-3 प्रकल्पाची एमएमआरडीएद्वारे उभारणी होणार आहे.ही उभारणी करताना आरे कॉलनी कारशेड तयार करण्याचे प्रस्ताविण्यात आले आहे. तर कारशेड बांधण्यासाठी आणि रस्ता रुंदीकरणासाठी मेट्रो प्रशासनाने 2 हजार 294 झाडे तोडण्यात येणार आहेत. सुरुवातीला 254 झाडे तोडण्यात येणार आहेत. तर, 2 हजार 44 झाडांचे पुनर्रेपन करण्यातयेणार असल्याचा प्रस्ताव पालिका वृक्ष प्राधिकरण समितीत मंजूरीसाठी आला होता. या प्रस्तावाला शिवसेना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी विरोध केला आहे. अगोदरच मुंबईतील झाडांची संख्या कमी होत आहे. त्यातच मेट्रोची वृक्षतोडणी म्हणजे मुंबईकरांची फसवणूक आहे. झाडे तोडल्यानंतर त्यांचे पुनर्रोपन झाल्यास ते जगतील की नाही याची शाश्वती नसल्याने आम्ही या वृक्षतोडीला विरोध करीत असल्याचे विश्वासराव सांगितले.तर, मेट्रो- 3 हा मुंबईच्या सार्वजनिक विकासासाठी पायाभूत देणारा प्रकल्प आहे. या उपक्रमामुळे पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होणारआहे. परंतु शिवसेने केलेला विरोध हानिर्रथक आहे. खासगी कंपन्याकडून झाडांची तोड करणारे प्रस्ताव तात्काळ मंजूर करून शेकडो झाडे बिनधास्त तोडली जातात. मग सार्वजनिक उपक्रमास शिवसेनेचा विरोध का, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. त्यामुळे मेट्रो- 3 प्रकल्पातील वृक्षतोडीच्या वादामुळे युतीची फांदी तुटण्याची शक्यता आहे.
