आमदारांना दुसर्‍या खोलीच्या बदल्यात दरमहा २५ हजार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदारांना दुसर्‍या खोलीच्या बदल्यात दरमहा २५ हजार

Share This

मुंबई : जुनी झालेली मॅजेस्टिक आमदार निवासाची इमारत पाडून नवी इमारत उभारायची असल्याने सध्या तेथे राहणार्‍या आमदारांना खोल्या देता याव्यात म्हणून आकाशवाणी आणि मनोरा आमदार निवासात ज्या आमदारांना राहण्यासाठी दोन खोल्या देण्यात आल्या आहेत, त्यापैकी त्यांनी एक खोली खाली करावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर आता ज्या आमदारांना दुसरी खोली देता येणार नाही, अशा १५१ आमदारांना दरमहा २५ हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे समजते. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ४ कोटी ५३ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
राज्यातील विधानसभेचे २८९ आणि विधान परिषदेचे ७८ असे एकूण ३६७ आमदार आहेत. त्यापैकी ३0 मंत्री, विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि दोन विरोधी पक्षनेते अशा ३६ जणांना शासकीय बंगले देण्यात आले आहेत. ते वगळता ३३१ आमदारांना प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ६६२ खोल्यांची आवश्यकता आहे. मात्र कुलाबा येथील जुने मॅजेस्टिक आमदार निवास जीर्ण झाल्याने ती इमारत पाडून तेथे नवी इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तेथे सध्या ९८ खोल्यांत राहणार्‍या आमदारांच्या निवासाची सोय आकाशवाणी व मनोरा आमदार निवासात करावी लागेल. त्यामुळे या दोन आमदार निवासातील आमदारांना देण्यात आलेल्या दोन खोल्यांपैकी एक खोली खाली करा. जर खोली खाली केली नाही, तर दररोजचे २000 रुपये दुसर्‍या खोलीचे भाडे आकारण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला. आमचे कुटुंब आमच्यासोबत असते तसेच मतदारसंघातील कार्यकर्ते आणि काही रुग्ण राहायला येत असल्यामुळे आम्हाला दोन खोल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका मांडली.

अखेर यावर तोडगा, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदारांना ज्येष्ठतेनुसार दोन खोल्यांचे फेरवाटप करण्याचे ठरले. आमदारांना प्रत्येकी दोन याप्रमाणे खोल्या द्यायच्या झाल्यास ६६२ खोल्या लागतील. मात्र सध्या ५११ इतक्याच खोल्या उपलब्ध असल्याने काही जणांना एक खोली द्यायची आणि ज्यांना दुसरी खोली मिळणार नाही त्यांना त्या बदल्यात दरमहा २५ हजार रुपये रक्कम द्यायची, असा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. अशा आमदारांची संख्या १५१ इतकी होईल. त्यांना दरमहा २५ हजार रुपये दिल्याने सरकारच्या तिजोरीवर वर्षाला ४ कोटी ५६ रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मान्य केला असून तो अर्थ खात्याकडून आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मंजुरी घेण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

मनोरा शेजारी आणखी एक आमदार निवास बांधणारजुने मॅजेस्टिक आमदार निवास पाडल्यावर नवीन इमारत बांधली, तरी तेथे आताच्या ९८ खोल्यांऐवजी ७६ इतक्याच खोल्या उपलब्ध होतील. त्यामुळे त्या आमदारांच्या संख्येत कमीच पडणार आहेत. त्यामुळे मनोरा आमदार निवासाच्या शेजारी नवी टोलेजंग इमारत उभारण्याचा सरकारचा विचार आहे. मनोरा शेजारी तसा प्लॉटही आहे, मात्र त्यावर अतिक्रमण झाले आहे. ते दूर केल्यावरच इमारत उभी राहू शेकेल. सद्यस्थितीत हे काम लवकर होणे शक्य दिसत नाही, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages