मुंबई: १ एप्रिल - अर्थसंकल्पात परफॉरमन्स बजेटच्या रकान्यात दिलेली आकडेवारी विसंगत असून ही आकडेवारी कशी चुकीच्या पद्धतीने दिली जाते त्याची जाहीर कबुलीच एका निवृत्त अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात दिल्याची बाब विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत वित्तमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही गंभीर बाब असून अशा पद्धतीने जर खोटी आकडेवारी पुरवली जात असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान केली.
अर्थसंकल्पातील आकडेवारी जर अधिकृत नसेल तर मग आम्ही कोणत्या मुद्यांवर प्रश्न विचारायचे असा सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय गंभीर असून चुकीची आकडेवारी सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार याची माहिती सभागृहाला द्या असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले. यावर बोलताना वित्तमंत्री म्हणाले की, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे,आणि जर खरे असेल तर हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. हे अर्थसंकल्प मांडताना आकडेवारीत जर काही चुका राहिल्या असतील तर आम्ही अधिवेशन संपण्यापुर्वी त्या सभागृहाच्या पटलावर ठेवू.तसेच जर त्यात कुठलाही अधिकारी अशी चुकीची आकडेवारी देत असल्याचे निष्पन्न झाले तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अाश्वासनही वित्तमंत्र्यांनी दिले.
