मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने आपल्या होमपेजवर खास डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना गुगलने नेहमीच विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान दिला आहे. भारताचे राजकारण, समाजकारण एकूणच भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
उच्चविद्याविभूषित असणारे बाबासाहेब स्वत:करिता जगले नाहीत, तर ते समाजाकरिता जगले. जातीव्यवस्थेविरोधात लढा देऊन बाबासाहेबांनी दलितांना त्यांचे न्याय, हक्क, अधिकार मिळवून दिले. बाबासाहेबांनी दलित समाजाला केवळ अन्यायाविरुद्ध लढण्यासच शिकवले नाही तर शिक्षणाची महत्ता पटवून देण्याचे एक ऐतिहासिक काम केले आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असणारे बाबासाहेब घटना समितीच्या मसुदा समितीचेही अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाबासाहेबांचे कार्य, कर्तुत्व लक्षात घेऊनच गुगलने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना खास डुडल समर्पित केले आहे. गुगलच्या इंग्रजी अक्षरांमध्ये दुसरा ‘ओ’ च्या जागी बाबासाहेबांचे छायाचित्र आहे.
