काळबादेवी आगीची चौकशी करण्याकरीता समिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2015

काळबादेवी आगीची चौकशी करण्याकरीता समिती

मुंबई / अजेयकुमार जाधव 
काळबादेवी येथील गोकुळ हाऊस इमारतीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. या आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी मृत झाले असून २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मेहता यांनी घटनेची चौकशी करण्याकरिता समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती आपला अहवाल तीन आठवडय़ांत महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे.
या समितीमध्ये संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा, उपायुक्त मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण (अग्निशमन सेवा), प्रमुख अभियंता यांत्रिकी व विद्युतीकरण, संचालक अभियांत्रिकी व सेवा, प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) हे सदस्य म्हणून तर आपत्कालीन व्यवस्थापनचे प्रमुख अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती आग लागण्याचे कारणे शोधणार आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाकडून कसा प्रतिसाद देण्यात आला याचा आढावा घेणार आहे. आग विझवताना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्धता कार्यान्वित करण्याच्या व्यवस्थेबाबत आणि आगीबाबतची माहिती वेळेत विविध यंत्रणा तसेच प्रसारमाध्यमे इत्यादींना उपलब्ध करण्याबाबत कोणत्या उपाय योजना कराव्यात यावर विचार करणार आहे. गजबजलेल्या परिसरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षेबाबत दीर्घकालीन उपाययोजना सूचित करण्यासाठी नेमण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS