येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्र - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्र

Share This
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, तसेच  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचे विविध प्रयोग करण्याचे कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्र (मिनी सायन्स सेंटर) उभारण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी लागणारा सर्व निधी हा स्थानिक आमदारांच्या निधीतून खर्च केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय 18 मे 2015 रोजी निर्गमित केला आहे.  

शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक शिक्षकांना गणित आणि इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक आमदारांच्या निधीतून शाळांमध्ये लघु विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
या योजनेनुसार शाळेच्या परिसरात किमान 500 चौरस फुटांची खोली संबंधित शाळांमध्ये असणे आवश्यक आहे. या केंद्रासाठी शाळेत एक पूर्णवेळ विज्ञान शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यकही असणे आवश्यक आहे. या केंद्रात रसायन, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणितशास्त्र या विषयातील साहित्य असणार असून यासाठी 1 लाख 35 हजार खर्च अपेक्षित आहे. ज्या शाळांमध्ये हे केंद्र उभारले जाणार आहे, त्या शाळा या शिक्षण हक्क अधिकार कायद्याची पूर्तता करणारी असणे आवश्यक असून त्यासोबत ती शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणेही आवश्यक आहे. शाळा निवडीची प्रक्रिया ही जिल्हा पातळीवरून करण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणारी समिती याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य असतील तर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव असतील.

लघु विज्ञान केंद्रामध्ये न्यूटनचा क्रिया-प्रतिक्षिप्त क्रिया नियम, कानेकोपरे असलेली दृष्टी, आर्किमिडीज स्क्रू, उंच-सखल पृष्ठभाग असलेले ट्रॅक, साखळी प्रतिक्षिप्त क्रिया, वर्तुळ आणि चेंडू, मंडळे किंवा मंडळांमधील फुगे, रंगांच्या छायाकृती, रंगाचे तापमान, कोपरा आरसा, दिवस आणि रात्र, फ्लोटिंग चेंडू, विमान किंवा जहाज स्थिर राहावे म्हणून त्यात बसवलेले जड गतिचक्र, हातपंप, मानवी हृदयाची प्रतिकृती, गणित प्रतिमा वस्तूचे जडत्व सिद्धांत, जादूच्या पाण्याचा नळ, न्यूटनचा पाळणा, न्यूटनची चकती, घड्याळाचा लंबक, सौरऊर्जा डेमो, पिसाचा टॉवर आदी विविध शोध - प्रयोगांचा समावेश असणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages