घाटकोपरमध्ये ३५0 लिटर गावठी दारू जप्त - दोघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

घाटकोपरमध्ये ३५0 लिटर गावठी दारू जप्त - दोघांना अटक

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात गावठी दारूला बंदी घालण्यात आल्यानंतरदेखील मुंबईत लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात गावठी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पंतनगर पोलिसांनी घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर गावठी दारूची वाहतूक करणार्‍या एका टोळीतील दोन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून सुमारे ३५0 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. 

घाटकोपर पूर्व येथून मोठय़ा प्रमाणात गावठी दारूची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. तिरमारे यांना मिळाली. पो.उ.नि. तिरमारे यांनी पो.नि. केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह मंगळवारी सायंकाळी सापळा रचला. त्याच दरम्यान काही महिला आणि पुरुष हातात बाजारासाठी वापरण्यात येणार्‍या पिशवीतून संशयास्पद वस्तू रिक्षातून घेऊन जात असल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकली असता एक महिला आणि एक पुरुष पोलिसांच्या हाती लागला, व इतर चौघे जण हातातील पिशव्या तेथेच टाकून पळून गेले. पंतनगर पोलिसांनी मुत्तपा म्हेत्रे (५८) आणि महादेव म्हेत्रे (१९) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या पिशव्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याजवळील पिशव्या तपासल्या असता त्यात हातभट्टीची गावठी दारू मिळून आली.

प्रत्येक पिशवीत २0 लिटर दारू अशी एकूण ३५0 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडे चौकशी केली असता ही गावठी दारू ठाणे जिल्ह्यातील दिवा येथून ट्रेनने आणण्यात आली होती. तेथून ती शिवाजी नगर, सायन, गोवंडी, मानखुर्द येथे विकण्यासाठी घेऊन जाणार होते, अशी माहिती ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS