सॅण्डहर्स्ट रोडजवळील हकॉक पूल दिवाळीनंतर तोडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2015

सॅण्डहर्स्ट रोडजवळील हकॉक पूल दिवाळीनंतर तोडणार

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर डायरेक्ट करंटचे (डीसी) अल्टरनेट करंट (एसी) विद्युत प्रणालीमध्ये रूपांतरण करण्यात आल्यामुळे रेल्वे मार्गावर असलेल्या पुलांची उंची आणि ओव्हरहेड वायरमधील अंतर, यामुळे सॅण्डहर्स्ट रोड स्थानकातील ब्रिटिशकालीन हकॉक पूल तोडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सुमारे २२ तासांचा विशेष ब्लॉक शनिवारी घेण्यात येणार आहे. हा पूल तोडण्याचे काम दिवाळीनंतर मध्य रेल्वे प्रशासन हाती घेण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावर डीसीचे एसीमध्ये विद्युत रूपांतरण झाले आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेले पूल आणि ओव्हरहेड वायरची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे. सॅण्डहर्स्ट रोड येथील हकॉक पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी वेगावर र्मयादा येते. परिणामी, हा पूल तोडण्याचे काम रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातर्फे हाती घेण्यात येणार आहे. हा पूल १३५ वर्षे जुना असून तो तोडल्यानंतर त्याजागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्या अभियांत्रिकी विभागाची तयारी झाली नसल्यामुळे हा पूल दिवाळीनंतर तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांना माहिती देण्यात आली आहे. त्यांचा सुरक्षेसंदर्भातील अहवाल आल्यानंतर हा पूल तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या पुलानंतर कर्नाक पूल आणि कुर्ला स्थानकाजवळील कसाईवाडा पूल तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे तिन्ही पूल एकाच वेळी तोडण्यात यावेत, यासाठी रेल्वे प्रशासन आग्रही होते. मात्र, अपुर्‍या मनुष्यबळामुळे ते शक्य होणार नसल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. हकॉक पूल तोडताना उपनगरीय वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. सीएसटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक भायखळा आणि दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेच संपवण्यात येणार असून तेथूनच डाऊन दिशेला चालवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. परिणामी, सीएसटीकडे जाणारी वाहतूक सुमारे २२ तास बंद ठेवण्यात येणार आहे.



Post Bottom Ad

JPN NEWS