नवी दिल्ली 6 Oct 2015 : कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाची फाईल नीती आयोगाने सोमवारी क्लीअर केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोकण रेल्वेच्या अद्ययावतीकरणानंतर प्रवाशांचा त्रास कमी होणार असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्याला दिवाळीची भेट दिली असल्याची चर्चा रेल्वे मंत्रालयात सुरू आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेच्या अद्ययावतीकरणाला नीती आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव लगेच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाकडून फाईल क्लीअर होताच कामाचे लगेच टेंडर काढले जाईल. एका महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वासही सूत्राने दर्शवला आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याची गरज नाही. आवश्यक तेवढी जागा मंत्रालयाकडे उपलब्ध आहे. कोकण रेल्वेचे जनक ई. श्रीधरन यांनी भविष्याचा विचार करून तेव्हाच जागेचे अधिग्रहण करून ठेवले असावे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिलकुमार सक्सेना यांनी दिली. तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी डोंगर-दर्यांमधून कोकण रेल्वेचे निर्माण केले होते. मात्र याचा खरा फायदा गोवा, कर्नाटक आणि केरळला झाला. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पूर्णपणे कोकणच्या विकासावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील आहेत, हे विशेष.
मोबाइलवर प्लॅटफॉर्म तिकीटरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा सपाटा लावला असल्याची आणखी एक प्रचिती आली आहे. मुंबई उपनगरासह देशभरातील उपनगरांमध्ये येत्या ९ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्मचे तिकीट मोबाइलवर मिळणार आहे. प्रवाशांना सोडायला येणार्या नातेवाईकांना प्लॅटफॉर्मच्या तिकिटासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने ही सोय उपलब्ध केली आहे. प्रवासी मोबाइलवर प्लॅटफॉर्मचे तिकीट डाऊनलोड करू शकतील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सुविधेचे उद््घाटन ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत करणार आहेत
