महापालिकेकडून चित्रीकरण परवानगी मिळवणे आता अधिक सोपे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेकडून चित्रीकरण परवानगी मिळवणे आता अधिक सोपे

Share This
मुंबई / प्रतिनिधी 
भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणारी मुंबई, ही भारतीय चित्रपट सृष्टीची राजधानी म्हणून देखील ओळखली जाते. आपल्या मुंबईमध्ये दररोज अनेक चित्रपटांचे व दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण होत असते. मुंबईचे व चित्रपट सृष्टीचे असणारे नाते लक्षात घेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील पदपथ, रस्ते, महापालिकेच्या शाळा, महापालिकेची उद्याने तसेच स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी चित्रपट किंवा दूरचित्रवाणी मालिकांच्या चित्रीकरणांसाठी देण्यात येणा-या परवानगीची प्रक्रिया सोपी व सुलभ केली असून शुल्काबाबत देखील सुधारीत दर लागू करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मराठी चित्रपट व मराठी दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी चित्रीकरण शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

यापूर्वी चित्रीकरण परवानगी प्राप्त करावयाची असल्यास ज्या विभागातील रस्ते, पदपथ, उद्याने इत्यादी ठिकाणी चित्रीकरण करायचे असेल, त्या विभागातील संबंधित अधिका-यांकडे अर्ज करुन परवानगी प्राप्त करावी लागत असे. तर महापालिकेच्या शाळांबाबत शिक्षण अधिकारी व महापालिकेच्या स्मशानभूमींबाबत उप-आरोग्य अधिकारी हे परवानगी देत असत. मात्र आता याबाबत जुनी पद्धत रद्द करण्यात आली आहे.  याबाबत जारी करण्यात आलेल्या नवीन परिपत्रकानुसार रस्ते, शाळा व स्मशानभूमी याबाबतच्या परवानगी साठी अर्ज करतांना तो संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे थेटपणे करता येणार आहे. तसेच याबाबत ऑनलाईन सुविधा देखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अर्ज करतांना त्यासोबत स्थानिक पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस यांचे ना - हरकत प्रमाणपत्र (NOC) जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्याठिकाणी चित्रीकरण करायचे आहे ती जागा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणांतर्गत असल्यास त्याबाबत संबंधितांचे ना – हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. भायखळा येथील महापालिकेच्या वीर जिजामाता भोसले उद्यानामध्ये चित्रीकरण करावयाचे असल्यास त्याबाबतची परवानगी संचालक (प्राणीसंग्रहालय) यांच्याद्वारे देण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त इतर चित्रीकरण विषयक परवानग्या संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावरुन देण्यात येणार आहेत.

चित्रीकरणासाठी आता सरसकटपणे १२ तासांच्या एका पाळीसाठी रुपये ८,०००/- इतके शुल्क करण्यात आले आहे. तसेच मराठी चित्रपट / मालिकांच्या चित्रीकरणासाठी यात ५०% सवलत देण्यात येणार आहे, म्हणजेच त्यासाठी रुपये ४,०००/- इतके शुल्क असणार आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये चित्रीकरण करावयाचे झाल्यास त्यासाठी रुपये १,२१,०००/- इतके परवानगी शुल्क आकारण्यात येत होते. ते आता १२ तासांच्या एका पाळीकरिता रुपये ५०,०००/- इतके करण्यात आले आहे.  तसेच महापालिका उद्यानांमध्ये मराठी चित्रपट / मालिकांच्या चित्रीकरणासाठी रुपये १५,०००/- इतके चित्रीकरण परवानगी शुल्क असणार आहे.

चित्रीकरण परवानगी शुल्क हे १२ तासांच्या एका पाळीकरिता (शिफ्टकरिता) व एका ठिकाणासाठी असणार आहे. यापूर्वी चित्रीकरण परवानग्यांसाठी आवश्यक असणारी सुरक्षा ठेव रक्कम व सफाई आकार (कन्झर्वन्सी चार्जेस) घेण्याची पध्दत आता बंद करण्यात आली आहे. चित्रीकरण स्थळाची / परिसराची साफसफाई करणे व इतर सर्व आवश्यक ती काळजी घेणे याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित अर्जदाराची असणार आहे. चित्रीकरणास परवानगी देणे अथवा नाकारणे या बाबतची संपूर्ण प्रक्रिया अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांमध्ये करणे नवीन परिपत्रकानुसार अपेक्षित आहे. सर्व चित्रीकरण परवानगी शुल्काबरोबरच अनुज्ञापन शुल्क (Licence Fees) रुपये ७१४०/- देणे आवश्यक आहे. या आधारावर प्राप्त होणा-या अनुज्ञापनाचा कालावधी ९० दिवसांचा असणार आहे. यानुसार संबंधित अर्जदाराने ९० दिवसांच्या कालावधी दरम्यानच्या चित्रीकरणासाठी परत अर्ज केल्यास त्यांना वेगळे अनुज्ञापन शुल्क द्यावे लागणार नाही असे पालिकेने कळविले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages