मुंबईतील वरळीत 'हिट अँड रन' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील वरळीत 'हिट अँड रन'

Share This


मुंबई - मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अ‍ॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अ‍ॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अ‍ॅट्रिया मॉलजवळच असणा-या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते.

मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नव-याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नव-याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आले नाही.

अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

वरळी पोलिसांनी हिट अ‍ॅड रन केसमध्ये एक पांढ-या रंगाची बीएमडब्ल्यू गाडी ताब्यात घेतली आहे. ज्यावर शिवसेनेचे पक्षाचे चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतले आहे.

राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, वरळीतील हिट अँड रन प्रकरण घडले त्यावेळी पांढ-या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय हस्तक्षेप नको -
वरळी येथील घटनेनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, सीसीटिव्हीमध्ये एक मुलगा गाडी चालवताना दिसला आहे. ही गाडी कोणत्याही पक्षाच्या नेत्याची असली तरी राजकीय हस्तक्षेप नको. दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली.

कोणालाही पाठीशी घालणार नाही -
अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतक्रिया दिली. ही दुर्दैवी अशी घटना आहे. घटना अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून गृह विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कायद्याच्या समोर सर्व समान आहेत. कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages