
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व टप्प्यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्राध्यक्ष (PRO), सहायक मतदान केंद्राध्यक्ष (APRO), मतदान अधिकारी (PO) तसेच इतर कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रशिक्षण सत्रे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ आणि सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ ते शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आदर्श आचारसंहिता, मतदान व मतमोजणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकारांशिवाय पार पडावी, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र नियुक्ती आदेशाद्वारे कळविण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षणास अनुपस्थिती मान्य केली जाणार नाही. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रशिक्षण सत्रात गैरहजर राहणाऱ्या, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम २८ (क) अन्वये फौजदारी कारवाईसह शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सदर बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment