घराणेशाही, कार्यकर्त्यांपेक्षा नातलगांना उमेदवारीसाठी प्राधान्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घराणेशाही, कार्यकर्त्यांपेक्षा नातलगांना उमेदवारीसाठी प्राधान्य

Share This

मुंबई - महानगरपालिका निवडणूक २०२५ (BMC Election) च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून (Political Party) घराणेशाहीविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, प्रत्यक्ष उमेदवारांच्या याद्यांमधून मात्र सर्वपक्षीय घराणेशाहीचे ठळक दर्शन घडत आहे. राज्यभरातील २९ महानगरपालिकांतील उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास, अनेक ठिकाणी तळागाळातील कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 

एकमेकांवर घराणेशाहीचे आरोप करणारे पक्ष स्वतःच या प्रवृत्तीपासून मुक्त नसल्याचे चित्र आहे. कोणताही प्रमुख पक्ष याला अपवाद ठरलेला नाही.

शिंदे गटातही घराणेशाहीचा आरोप - 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करून वेगळा झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातही मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये नातलगांना उमेदवारी दिल्याचे दिसते.

जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७३ मधून खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती अमेय वायकर–पोतनीस रिंगणात आहेत. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या मुलगा आणि मुलगी या दोघांनाही उमेदवारी देण्यात आली असून, दादरमधून माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि त्यांची बहीण प्रिया सरवणकर यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा, आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपमध्येही नातलगांना प्राधान्य - 
भाजपमध्येही घराणेशाहीचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. कुलाबा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि दुसऱ्या भावाच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मकरंद नार्वेकर यांची बहीण गौरवी शिवलकर यांनी प्रभाग २२७ मधून अर्ज भरला आहे.

केंद्रीय नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या, सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर, तर आमदार राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांचीही उमेदवारी निश्चित झाली आहे.
पुण्यात आमदार बापू पठारे यांच्या कुटुंबातील तिघांना भाजपकडून संधी देण्यात आल्यानेही चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्या घरातील तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामध्ये बंधू कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक यांचा समावेश आहे.

काँग्रेसमध्येही घराणेशाही - 
काँग्रेसमध्ये मालाड विधानसभा मतदारसंघात आमदार अस्लम शेख यांच्या नातेवाईकांसाठी चार प्रभाग सोडण्यात आले आहेत. त्यात पुत्र हैदर अस्लम शेख, बहीण कमरजहाँ सिद्दीकी, मेहुणा सैफ अहद खान आणि भाचा रफीक शेख यांना मालाड व वर्सोवा परिसरातून उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गटातही नातलगांना संधी - 
ठाकरे गटातही काही ठिकाणी घराणेशाहीचा आरोप होत आहे. मुंबईत आशिष चेंबुरकर, सुनील प्रभू, सुनील शिंदे यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे, तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे रिंगणात उतरले आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - 
सर्वच पक्षांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नातलगांना उमेदवारी दिल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घराणेशाहीविरोधातील राजकीय भाषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “आरोप फक्त विरोधकांवर आणि कृती मात्र स्वतःसाठी वेगळी” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ही घराणेशाही मतदारांच्या कितपत पसंतीस उतरते, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages