थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस, मेट्रो-३ रात्रभर धावणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2025

थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस, मेट्रो-३ रात्रभर धावणार


मुंबई - नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सोयीचा व्हावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनानुसार थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईत रात्रभर सार्वजनिक परिवहनसेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, बेस्ट उपक्रमातर्फे २५ जादा बसेस धावणार आहेत. तसेच मुंबई मेट्रो प्रशासनानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो-३ (ॲक्वा लाईन) रात्रभर सुरू - 
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घेतलेल्या निर्णयानुसार, ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री आरे ते कफ परेड दरम्यान धावणारी मेट्रो-३ (ॲक्वा लाईन) ही रात्रभर सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होऊन १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजेपर्यंत चालू राहील. त्यानंतर नेहमीप्रमाणे नियमित मेट्रो सेवा सुरू होईल. त्यामुळे नववर्षाच्या जल्लोषानंतर मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बेस्टच्या २५ जादा बसेस - 
नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मढ-मार्वे चौपाटी यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे बुधवारी रात्री २५ जादा बस धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत बाहेर असणाऱ्या प्रवासी व पर्यटकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

अतिरिक्त बसमार्ग - 
बुधवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री १२.३० वाजेपर्यंत खालील बसमार्गांवर अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत –

सामान्य बसमार्ग : C-8.6, 203, 231

वातानुकूलित बसमार्ग : A-21, 9-112, 9-116, A-247, A-272, A-294

हेरिटेज टूरलाही प्रतिसादानुसार सेवा - 
‘हेरिटेज टूर’ या विशेष बसमार्गावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सेवा चालविण्यात येणार आहे.

नियम पाळण्याचे आवाहन - 
नववर्षाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच मेट्रो व बेस्टच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS