
कोपरगाव (दिलीप गायकवाड) - कोपरगाव नगर परिषद हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी पायाभूत सुविधा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजना प्रकल्पातील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे २२७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी मे. मंगळिया ब्रदर्स प्रोजेक्ट अँड जयंती सुपर (जेनी), गुजरात या कंपनीमार्फत करण्यात येत आहे.
प्रकल्पातील कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत असून, यापूर्वीही यासंदर्भात पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, दि. २० जानेवारी २०२६ रोजी झालेल्या आमरण उपोषणावेळी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, प्रकल्प सल्लागार व ठेकेदारांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप विनय भगत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कोपरगाव तालुका तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत प्रकल्पाच्या कामाचा दर्जा, नागरिकांकडून प्राप्त तक्रारी तसेच पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी कामातील त्रुटी, कथित गैरप्रकार आणि आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याबाबत आपली मते मांडली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत असून योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

No comments:
Post a Comment