शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; घाटकोपरमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 July 2026

शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; घाटकोपरमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी


मुंबई | जेपीएन न्यूज -
घाटकोपर (पूर्व) येथे शिवसेनेच्या शिंदे गटातील दोन स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कथित हाणामारीमुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरसेवक सुरेश आवळे आणि घाटकोपर पूर्व विधानसभा अध्यक्ष यशवंत मोरे यांच्यात बुधवारी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक कारणांवरून मतभेद सुरू होते. सुरेश आवळे यांच्याकडे विभागप्रमुखपदाची जबाबदारी आल्यानंतर काही जुन्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे.

याशिवाय, एका कंत्राटाच्या मुद्द्यावरूनही दोघांमध्ये वाद वाढल्याचा दावा स्थानिक स्तरावर केला जात आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

बुधवारी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर कथित हाणामारीत झाल्याचे सांगितले जात असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

घटनेनंतर दोन्ही नेते पंतनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर दोघांमध्ये समेट झाल्याची माहिती समोर आली असून, कोणत्याही पक्षाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी सांगितले, "दोन्ही संबंधित व्यक्तींमध्ये समेट झाला असून सध्या कोणताही वाद शिल्लक नाही. या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही."

दरम्यान, शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील हा वाद आणि त्याचा व्हायरल व्हिडिओ यामुळे घाटकोपरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, वादामागील कारणांबाबत विविध दावे केले जात असले तरी त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS