'स्किल फर्स्ट' महाराष्ट्राकडे वाटचाल; जागतिक रोजगारासाठी तीन करार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'स्किल फर्स्ट' महाराष्ट्राकडे वाटचाल; जागतिक रोजगारासाठी तीन करार

Share This

मुंबई | JPN NEWS -
जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्यातील कौशल्य विकासाला नवी दिशा देणारे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने 'दक्ष' प्रकल्पांतर्गत प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ, आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी तीन सामंजस्य करार आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण (RPL) उपक्रमाला हिरवा कंदील देण्यात आला.

मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या 'दक्ष' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४० आयटीआय प्रशिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, CNC मशीनिंग, रेफ्रिजरेशन, प्लंबिंग, वेल्डिंग, सर्व्हेअर, COPA आणि एरोनॉटिकल स्ट्रक्चर यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो यांसारख्या उद्योग समूहांनी सहकार्य केले आहे.

उद्योगाभिमुख कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी SEEID, 2 COMS Consulting Private Limited, Border Plus Technology Private Limited आणि Quess International Services Private Limited यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षण, प्रस्थानपूर्व मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, नियोक्त्यांशी समन्वय, डिजिटल ट्रॅकिंग आणि प्लेसमेंटनंतरचे सहाय्य उपलब्ध होणार असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होणार आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ४,००० उमेदवारांचे पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण (RPL) आणि ३०० उमेदवारांना अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनला इरादा पत्र (LoI) प्रदान करण्यात आले.

यावेळी WorldSkills Shanghai 2026 स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पाच विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सुवर्णपदक विजेत्याला ₹५ लाख, रौप्यपदक विजेत्याला ₹३ लाख आणि कांस्यपदक विजेत्याला ₹२ लाख रोख पारितोषिक देण्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

याशिवाय मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय आयटीआयमधील IoT अभ्यासक्रमातील प्रशिक्षणादरम्यानच नोकरी मिळालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत दोन प्रशिक्षण संस्थांना इरादा पत्रही प्रदान करण्यात आले.

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देत महाराष्ट्राला अधिक कौशल्यसंपन्न राज्य बनविण्यासाठी शासन, उद्योग आणि प्रशिक्षण संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages