महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची ‘केशवसृष्टी’ सहल रद्द करा; आमदार रईस शेख यांची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2026

महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची ‘केशवसृष्टी’ सहल रद्द करा; आमदार रईस शेख यांची मागणी


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची भाईंदर-उत्तन येथील केशवसृष्टी येथे प्रस्तावित करण्यात आलेली शैक्षणिक सहल रद्द करावी, तसेच महापालिका शिक्षण व्यवस्थेचे कथित ‘भगवीकरण’ थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे.

महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहल केशवसृष्टी येथे नेण्याचा प्रस्ताव २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आल्याचा दावा आमदार रईस शेख यांनी केला आहे. या सहलीसाठी महापालिकेकडून २ कोटी ४३ लाख रुपये खर्च प्रस्तावित असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

केशवसृष्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून स्थापन करण्यात आलेली संस्था असल्याचा दावा करत, अशा संस्थेत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करणे योग्य नसल्याचे रईस शेख यांनी म्हटले आहे.

“केशवसृष्टीसारख्या धार्मिक एकारलेपणा असलेल्या संस्थेत विद्यार्थ्यांची सहल नेणे म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण आहे,” असा आरोप त्यांनी केला. महापालिका प्रशासन हे भारतीय राज्यघटनेला बांधील असून राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्यांचा विचार करता धार्मिक उद्देश असलेल्या संस्थेत शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी श्रीराम यांच्या चरित्रावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळीही विरोध झाल्याचा उल्लेख आमदार शेख यांनी केला.

महापालिकेवर कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी प्रशासनाला धार्मिक हेतूंसाठी काम करता येणार नाही. महापालिका प्रशासनाच्या धर्मनिरपेक्ष वारशाला तडा जाऊ देऊ नये, असे सांगत केशवसृष्टी येथील प्रस्तावित सहल तातडीने रद्द करावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS