
मुंबई JPN NEWS - दादर येथील मॉं साहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार आणि क्रांतिसिंह नाना पाटील महानगरपालिका भाजी मंडईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावण्यासाठी अभिनव प्रकल्प राबविण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी २२ ऑगस्ट रोजी परिमंडळ-२ अंतर्गत एफ उत्तर आणि जी उत्तर विभागातील विविध परिसर व प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी दादरच्या फुल बाजारातील दररोजच्या सुमारे १० मेट्रिक टन टाकाऊ फुलांवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्याच्या शक्यता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या.
टाकाऊ फुलांपासून सेंद्रिय खत, अगरबत्ती यांसारखी उत्पादने तयार करता येऊ शकतात. त्यामुळे फुलांचा कचरा क्षेपणभूमीवर नेण्याचा ताण कमी होण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचपणी करून स्वयंसेवी संस्था व व्यापारी संघटनांच्या सहकार्याने प्रकल्प राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील क्रांतिसिंह नाना पाटील महानगरपालिका भाजी मंडईत दररोज सुमारे १५ मेट्रिक टन भाजीपाल्याचा कचरा निर्माण होतो. या कचऱ्यापासून भूकटी, गॅस तसेच सेंद्रिय उत्पादने तयार करण्याच्या शक्यता तपासून त्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले.
फुल बाजार आणि भाजी मंडई परिसरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि दैनंदिन स्वच्छतेच्या समस्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. व्यापारी संघटनांनीही रस्त्यावर मालवाहू वाहने उभी न करता निर्धारित जागेत पार्किंग करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
लालबाग गणेशोत्सवाच्या तयारीचाही आढावा -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परिसराचीही पाहणी करण्यात आली. भाविकांसाठी स्वच्छता, रांग व्यवस्थापन, बॅरिकेडिंग आणि वैद्यकीय सुविधांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिल्या. गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
याशिवाय माहीम मच्छीमार वसाहतीपासून पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे) आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यात आली. प्रकल्पासाठी आवश्यक पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यास तसेच अडथळा ठरणाऱ्या बांधकामांचे विहित वेळेत निष्कासन करून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.


No comments:
Post a Comment