कुर्ल्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर क्रेन नेताना अपघात; १० जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2026

कुर्ल्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर क्रेन नेताना अपघात; १० जखमी


मुंबई JPN NEWS - कुर्ला पूर्वेतील इंदिरानगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने पोकलेन मशीन नेण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना सायन रुग्णालयात, तर दोघांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

हा अपघात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) पहाटे सुमारे ३.०४ वाजता बंटारा भवन, म्हाडा इमारत, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या मागील बाजूस, इंदिरानगर, कुर्ला (पूर्व) येथे घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका ग्राउंड प्लस १७ मजली बांधकामाधीन इमारतीवर पोकलेन मशीन नेण्यासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर करण्यात येत होता. यावेळी क्रेनचा काही भाग कोसळून जवळील रेल्वेच्या उच्चदाबाच्या ओव्हरहेड वायरवर तसेच कुरेशी नगरमधील झोपड्यांवर पडला. याशिवाय सम्राट अशोक नगर रस्त्यालगतचा परिसर, म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत आणि म्हाडा इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांचेही नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि बीएमसीच्या संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला काही नागरिक क्रेनच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाल्याने बचावकार्य हाती घेण्यात आले.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नावे जगरुल्ला नबी मोहम्मद खान (६३), अहमद नियाज अहमद (३ महिने), अतिकुर रहमान (६०), हाकुम शेख (३६), नुमान खान (२१), रहमान खान (१९), सुरज गौर (१०) आणि अकबर (४०) अशी आहेत.

तर राजू गौड (३५) आणि आरती गौड (३०) या दोघांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या ठिकाणी म्हाडाकडून निष्कासन अथवा पाडकामाची कारवाई प्रस्तावित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईसाठी क्रेन बसविण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेत आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून तपासणी सुरू आहे.

अपघाताचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS